
– दिव्यांग हेमराज कळंबे सरांचा थक्क करणारा जीवन प्रवास
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
संपादकीय लेख – प्रफुल्ल ठाकरे
शिक्षक म्हणजेच शि – शीलवान, क्ष – क्षमाशील, क – कर्तृत्ववान ज्यामध्ये हे सर्व गुण असतात, तोच खरा आदर्श शिक्षक होय. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक व सल्लागार असतो. त्यामुळे शिक्षक हा चारित्र्यसंपन्न, शीलवान व आदर्शाचे पालन करणारा असावा अशी रास्त अपेक्षा असते.हे सर्व गुण हेमराज कळंबे सरात जन्मजात आहेत.
नुकताच आदर्श शिक्षक सोहळा यवतमाळ येथे पार पडला. त्यात कळंबे सरांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.”एका पायाने दिव्यांग ते आदर्श शिक्षक” ही वाट मुळीच सोपी नव्हती.
हेमराज गणेश कळंबे सरांचा जन्म भिष्णुर ता.नरखेड जि. नागपूर येथे झाला.तीन भाऊ एक बहीण असे कुटुंब.सरांनी वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचा आधारवड गमावला. आणि कुटुंबाचा गाडा हाकायची जबाबदारी त्यांचे आईवर येऊन पडली.
अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना मामाच्या मदतीने सरांना अपंग आदिवासी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला खरा…पण वाट बिकट होती. वही पुस्तक घेण्याची सोय नसताना सरांना पुनश्च एकदा आसरा मिळाला तो त्यांच्या मामांचा.
सरांचे मामा स्वतः शिक्षक असल्याने शिक्षणाचे महत्त्व त्यांना माहीत होते. त्यांनी सरांना यथोचित मदत केली. सर अपंग असल्याने सुरुवातीला सरांकडे तेथील शिक्षकांनी कानाडोळा केला. पण म्हणतात ना गुणवत्ता लपत नाही…असेच काहीसे सरांच्या बाबतीत घडले.
वर्गात कायम शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या सरांचा प्रथम सत्रांत परीक्षेत जेव्हा वर्गातुन तीसरा क्रमांक आला तेव्हा तेथील शिक्षकांचे डोळे उघडले. तेथील शिक्षकांनी सरांना स्वतः हुन पहिल्या बेंचवरती बसावयास सांगितले. इथून सरांच्या डोक्यात आत्मविश्वास निर्माण झाला. जो अजून पावेतो कायम आहे.
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सर त्या शाळेतून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.विज्ञान शाखेला जाण्याची इच्छा असताना सुद्धा सर बिकट परिस्थिती अभावी जाऊ शकले नाही. विज्ञानाची शाखा ही काटोल आणि नरखेड येथे तालुक्याच्या ठिकाणी असल्याने आपण आर्थिक दृष्ट्या पुरू शकणार नाही ही जाण सरांना होती.यश मिळत होतं पण वाट अजून खडतरच होती.
दरम्यान सरांना सोबत मिळाली ती त्यांच्या भाऊजींची. भाऊजींच्या सांगण्यावरून सरांनी कला शाखेला प्रवेश घेतला. त्यानंतर डीएड करून नागपूर विभागातून अपंगातून प्रथम येत आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला.
कळंबे सर सर्वप्रथम शिक्षक म्हणून रुजू झाले ते यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वनजादेवी येथे. तिथे आपल्या सतरा वर्षाच्या कारकिर्दीत या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने अनेक विद्यार्थी घडविले. आज त्यातील काही विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहेत ही बाब खरंच अभिमानास्पद आहे.
पायाने दिव्यांग असल्याने सरांना वनोजादेवी ते मारेगाव ये-जा करणे शक्य नव्हते. त्यात स्वतःचे वाहन नसल्याने सरांनी वनजादेवी येथे चक्क सतरा वर्ष स्थायी शिक्षक म्हणून अहोरात्र कार्य केले. हे विशेष उल्लेखनीय.
२०१८ साली बदली होऊन सर धामणी येथे रुजू झाले. तिथे त्यांची सेवा आजही अविरत सुरू आहे.ईब्टा शिक्षक संघटनेचे यवतमाळ जिल्हा कोषाध्यक्ष, मारेगाव तालुका ओबीसी जनजागृती कृती समिती सभासद ते आदर्श शिक्षक इ. मानाची पदे सरांकडे असताना सरांनी आपले समाजसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.
‘फक्त यशस्वी लोकांचा संघर्ष दिसतो अयशस्वी लोकांचा नाही’…हे जरी खरे असले तरी ‘यशस्वी लोकांचा संघर्ष मांडल्यानेच अयशस्वी लोकांना यशाची वाट दृष्टीस पडते…!’ एका पायाने दिव्यांग कळंबे सरांचा हा प्रवास नक्कीच भल्याभल्यांना प्रेरित करणारा आहे.