
– ‘लॅब’ फक्त नावापूरती
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगावातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर,कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने रुग्णांची गैरसोय होत असतानांच आता रुग्णांच्या तपासणी करीता उपलब्ध झालेले एक्स-रे मशीन टेक्निशियन अभावी धूळ खात बंद पडुन असल्याचे वास्तव असुन रुग्णालयातील ‘लॅब’ फक्त नावापुरती उरली आहे.
तालुक्यातील १०८ गावांसाठी शहरात ३० बेडचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय आहे.वणी-यवतमाळ रोडवरती सातत्याने होणारे अपघात पाहता कधीही गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होतात.तसेच विषप्राशन,सर्पदंश यासारख्या रुग्णांची संख्या सुद्धा मोठी आहे.अशातच रुग्णालयात डॉक्टरांसह, कर्मचारी अपुरे असल्याची ओरड गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे.
कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करीत येथील अनेक विभाग बंद ठेवले जात असून लॅब टेक्निशियन अभावी लॅबचा पुरता गोंधळ उडाला आहे.रुग्णांचे थुंकी चे सँपल चक्क वणी येथे ‘गो टू रेफर’ केले जात असून रुग्णालयातील एक्सरे मशीन टेक्निशियन अभावी गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे.ग्रामीण रुग्णालयातच सर्वं सोयी उपलब्ध असताना नागरिकांना मात्र हेलपाटे मारत वणी येथे जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडासह नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
गेल्या काही वर्षांतील ग्रामीण रुग्णालयाचा ढासळता आलेख पाहता रुग्णालयाच्या कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी विविध स्तरावरून जोर धरू लागली आहे.