
– अनेक गावात स्वच्छतेचे धिंदवडे,कारवाईची गरज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ सर्वत्र राबविण्यात येत आहे.परंतु सद्यस्थितीत हे अभियान फक्त कागदोपत्रीच मर्यादित राहिले असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत तालुक्यात उघड्यावर शौच करणाऱ्यांसाठी गुड मॉर्निंग पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.आता गुड मॉर्निंग पथकच बेपत्ता असल्याचे वास्तव तालुक्यात आहे.
गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर,तलावाच्या काठावर किंवा रस्त्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती.परंतु आता गुड मॉर्निंग पथक तालुक्यातून बेपत्ता झाले असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात अस्वच्छतेने कळस गाठल्याचे भीषण वास्तव असुन संबंधित विभागाचे सदर बाबीकडे दुर्लक्ष होते आहे.
नियमानुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत ‘या’ पथकानुसार जनजागृती तसेच उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देष आहे.
सुरुवातीला काही महिने या पथकाकडून धडक कारवाई होताना दिसली.विशेषतः सकाळी उघड्यावर शौच करणाऱ्यांना सदाफुलीचे फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत होता.
परिणामी कुठे लाजेने तर कुठे कारवाईच्या भीतीने काही प्रमाणात का होईना उघड्यावर शौच करणाऱ्यांना आळा बसला होता.सद्यस्थितीत मात्र या बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असुन तालुक्यातून गुड मॉर्निंग पथक बेपत्ता झाले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत प्रत्येक घरी शौचालय बांधण्यात यावे या करिता अनुदान देण्यात आले.शौचालय ही बांधण्यात आले परंतु त्याचा वापर मात्र केला जात नाही.
ग्रामीण भागातील शौचालय ही फक्त शोभेची वास्तू बनुन राहिली आहे. शौचालय असताना सुद्धा ग्रामीण भागातील नागरिक शौचास उघड्यावर जात असल्याचे वास्तव असुन तालुक्यातील प्रत्येक गावात ‘गुड मॉर्निंग पथक’ सक्रिय होण्याची गरज आहे.