
— जनतेची कामे कासवगतीने, विकासाला बसतोय खिळ
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मोरेश्वर ठाकरे : मारेगाव
तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायत असुन आदिवासीबहुल तालुका असल्याने २४ ग्रामपंचायत पेसा अंतर्गत आहेत. मात्र तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतच्या कारभाराची धुरा केवळ ३२ कायमस्वरुपी व ३ कंत्राटी एकुण ३५ ग्रामसेवकावर आल्याने तालुक्यातील जनतेची कामे कासव गतीने होत असुन विकासाभिमुख कामाला खो बसत असल्याचे चित्र आहे. मात्र अजुनही १० ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत.
निसर्गाचे वरदान असलेला मारेगाव तालुका हा वन संपदेनी नटलेला असुन हजारो हेक्टर वनक्षेत्र आहे. वनसंपदेनी नटलेल्या मारेगाव तालुक्यात शंभरावर गावखेडी असुन उद्योग नसल्याने शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. तालुक्याची शेती व्यवसायाशी मुख्य नाळ जोडलेली असल्याने जंगल भागाला लागुल डोंगर, माळरानावर अनेक आदिवासी गाव पाडे आहे. आपली संस्कृती जोपासत ही गावे परिसरात वास्तव्यास आहे.
ग्रामिण भागातील विकासाभिमुख कार्यास चालना मिळावी व स्थानिक स्तरावर विकास साधण्यासाठी, व गावाचा कारभार सुरळीत चालावा यासाठी ग्रामिण स्तरावरील मिनीमंत्रालय असलेली ग्रामपंचायत ही कारभार सांभाळते. सरपंच, उपसरपंच, व शासनाचे प्रतिनिधित्व ग्रामसेवक करत असुन गाव विकासाच्या दृष्टीने ग्रामसेवक हा गावकरी व शासनामधिल महत्वाचा दुवा आहे.
ग्रामसेवकांकडे ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे. गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे. लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे. करवसुल करणे. जनतेला विविध प्रकारची दाखले देणें. जन्म-मृत्यू,उपजतमृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून काम पाहणे. बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कामकाज करणे. मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज करणे. बांधकाम कामगार यांची नोंदणी करणे. जनमाहिती अधिकारी कामकाज करणे. जैव विविधता समिती सचिव म्हणून काम करणे.आपत्कालीन समिती सचिव म्हणून कामकाज करणे. झाडे लावणे, शौचालय बांधून ते वापरायला शिकविणे. ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाजासह गावात रस्ते बांधणे. गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे. दिवाबत्तीची सोय करणे. जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था करणे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे. गावाचा बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवणे. ग्राम पंचायत हद्दीतील येणारे कर व शासना कडून येणारी निधी यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करण्यासाठी त्यांची नेमणूक केली जाते.
मात्र तालुक्याला सध्या बहुतांश कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांची वारेमाप कमतरता असतांना ग्रामिण भागातील मिनी मंत्रालय म्हणून तालुक्यात ५६ ग्रामपंचायत असुन यातील २४ ग्रामपंचायत ह्या पेसा अंतर्गत आहे. मंजूर पदे ही ४५ असली तरी अनेक दिवसापासून ५६ ग्रामपंचायतचा डोलारा ३२ कायमस्वरुपी व ३ कंत्राटी ग्रामसेवक सांभाळीत असल्याने, याच कार्यरत काही ग्रामसेवकांवर दोन ग्रामपंचायतचा कारभार असल्याने जनतेची कामे कासवगतीने होत असुन विकासाला मात्र पुरता खो बसत आहे.