
♦रेती अभावी घरकुलाचे बांधकाम ठप्प…
♦ लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगांव
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक घरकुल मंजूर आहे.परंतु घर बांधणी साहित्याचे आजचे दर पाहता गरिबांना आपले “स्वप्नांचे घर बांधणे”हे स्वप्नच ठरत आहे.शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंजा अनुदानात घर बांधायचे कसे…?हा प्रश्न असतानाच तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव अद्याप न झाल्याने रेतीचे भाव मात्र गगनाला भिडले आहे.तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव लवकरात लवकर करून घर बांधणीसाठी रेती उपलब्ध करावी अशी मागणी विविध स्तरावरून आता होऊ लागली आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे राहणीमान उंचावे,त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न कायम सुटावा यासाठी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधुन देणारी “घरकुल योजना” शासनाने सुरू केली.त्या अनुषंगाने तालुक्यात रमाई आवास योजना,प्रधानमंत्री आवास योजना,शबरी आवास योजना अंतर्गत हजारो घरकुले मंजूर आहेत.परंतु प्रत्यक्षात मात्र घरांचे बांधकाम रखडलेले आहे.घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाढीव दर व आवश्यक रेतीची अनुपलब्धता असल्याने घरकुल लाभार्थी रेतीसाठी भटकंती करताना दिसून येत आहे.रेती अभावी घराचे बांधकाम करायचे कसे…? हा यक्षप्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे.
तालुक्यात वर्धा नदीवरील कोसारा दांडगाव,आपटी,गाडेगाव आदी ठिकाणी मौल्यवान रेती घाट आहेत तर निरगुडा नदी व इतर नाल्यांवर सुद्धा रेतीचे मुबलक साठी आहे.परंतु जिल्हा प्रशासनाने अजून पावेतो तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव केलेला नसल्याने शहरासह तालुक्यात “रेती तस्करांची चलती असून”रेतीचे दर मात्र गगनाला भिडले आहे.आधीच घरकुलाचे तुटपुंजे अनुदान त्यात रेतीचे वाढीव दर गरिबांच्या स्वप्नांची राख रांगोळी करताना दिसून येत आहे.साहेब घरकुल तर मंजूर झाले आता “रेतीही उपलब्ध करून द्या” अशी मागणी विविध स्तरावरून आता जोर धरू लागली आहे.