
– रुग्णांच्या आरोग्याशी खेळ
– ग्रामीण भागातील भीषण वास्तव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले असून गावोगावी मुन्नाभाईंचा उच्छाद पहावयास मिळतो आहे.बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचाराने आदिवासी आणि गरीब रुग्णांचे आरोग्य पुरते धोक्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली असून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. यातील काही डॉक्टर तर चक्क आपली बॅग घेऊन खेडोपाडी फिरून आदिवासी व गरीब रुग्णांवर चुकीचे औषधोपचार करत असल्याची चर्चा आहे.
या मुन्ना भाईंजवळ महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कोणतेही प्रमाणपत्र नाही. परंतु आपण ‘असाध्य रोगही दुरुस्त करीत असल्याचा खोटा प्रचार’ ही बोगस डॉक्टर मंडळी करीत असून भोळीभाबडी जनता त्यांच्या भूलपाथांना बळी पडत असल्याचे तालुक्यात चर्चीले जात आहे.
बोगस डॉक्टरांचे काही चमचे परिसरात सक्रिय असून ते ‘असाध्य रोग दुरुस्त होत असल्याचा खोटा प्रचार’ करीत आहे. या भामट्यांच्या खोट्या प्रचाराला अनेक आदिवासी रुग्ण बळी पडत असल्याचे सुतोवाच ग्रामीण भागात आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ढेपाळली असल्याने नागरिकांना वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने या बोगस डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. वैद्यकीय क्षेत्राची कुठलीही पदवी नसताना मोठ्या आत्मविश्वासाने यांचे कडून रुग्णांवर उपचार केले जातात. तालुक्यातील या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.