
♦महागाई पेक्षा धुरच बरा-ग्रामीण भागातील वस्तुस्थिती
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
२०१६ मध्ये मोठा गाजावाजा करून “पंतप्रधान उज्ज्वला योजना”सुरू करण्यात आली.स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे भरभरून कौतुक केले.सुरुवातीला नागरिकांनी उज्ज्वला योजनेला भरभरून प्रतिसाद दिला असला तरी सद्यस्थितीत मात्र ही योजना तालुक्यातून भुईसपाट होताना दिसत आहे.सर्वत्र महागाईचा आगडोंब उडाल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.गॅस सिलेंडरचे दर अवाक्या बाहेर गेल्याने महागाई पेक्षा धूरच बरा ही वस्तुस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.
अलीकडे घरगुती गॅस सिलेंडरचे दर अवाक्या बाहेर गेल्याने गृहिणींचे नियोजनच कोलमडले आहे.गेल्या दोन वर्षात गॅस सिलेंडरचे दर दुपटीने वाढले असून यावर मिळणारी सबसिडी सुद्धा बंद करण्यात आलेली आहे.ती का बंद करण्यात आली..? या प्रश्नावर मात्र कुठेही चर्चा होताना दिसून येत नाही.
दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने २०१६ मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली.सदर योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले.
मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेला सुरुवातीस चांगला प्रतिसाद मिळाला.परंतु गॅस सिलेंडरचे वाढ वाढते दर,वाढती महागाई,शासनाकडून बंद करण्यात आलेली सबसिडी यामुळे सद्यस्थितीत मात्र सदर योजनेकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली असून एकदा भरून आणलेले सिलेंडर परत भरलेच नाही.तालुक्यातील ग्रामीण भागात गृहिणी पारंपारिक इंधनाला प्राधान्य देत असून “महागाई पेक्षा धुरच बरा”ही वस्तुस्थिती तालुक्यात सर्वत्र दिसून येत असुन उज्ज्वला योजना फक्त कागदोपत्रीच मर्यादित राहिली असल्याचे वास्तव तालुक्यात आहे.