
– १९ वर्षीय मुलींचा संघ कबड्डीत विजयी
– आता लक्ष जिल्हास्तरावर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील नवरगाव येथील पंचशील विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यात १९ वर्षीय मुलींच्या कबड्डीत मारेगावातील संकेत कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात कला वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाविरुद्ध बाजी मारत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद काबीज केले.
ज्ञानाचे धडे गिरवण्यासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या अनुषंगाने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.या छोटेखानी स्पर्धांतून उद्याचे भावी खेळाडू तयार करणे हा उद्देश असतो.
दरम्यान ता.२० सप्टेंबर पासून मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील पंचशील विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांची थाटात सुरुवात झाली होती.यात १४ वर्ष,१७ वर्ष व १९ वर्षाखालील मुला-मुलींचे कबड्डीचे थरारक सामने रंगले होते.यात १९ वर्षाखालील मुलींतुन मारेगावातील संकेत कला कनिष्ठ व विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने अंतिम सामन्यात कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मुलींच्या संघावर विजय मिळवत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद काबीज केले.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर संकेत महाविद्यालयाचे पुढील लक्ष जिल्हास्तरावर लागले आहे.
विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय संकेत महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एम.निखाडे यांचेसह क्रीडा शिक्षक कावडे,प्रा.खंगन,बोढे,कु.आवारी,कु.जाधव, कु. धानकी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश पंधरे,शैलेश गोहोकार, गजू पेन्दे यांना दिले आहे.