
– तलाठ्यांना गाव-खेड्याची एलर्जी
– मारेगाव बनले तलाठ्यांचे माहेरघर
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
शासनाने लाखो रुपये खर्चून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये तलाठी कार्यालये बांधली.परंतु गावातच प्रशस्त इमारती असूनही तलाठी ‘गाव कार्यालयात’ न येता त्यांचा कारभार मारेगाववरून चालवतात.परिणामी गाव-खेड्यातील तलाठी कार्यालये ओस पडली असुन ग्रामस्थांना कागदपत्रांसाठी मारेगाव येथे जावे लागत असल्याने नाहक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
तालुक्यामधील अनेक गावांमध्ये शासनातर्फे तलाठी कार्यालये बांधण्यात आली. काही गावांमध्ये जागा उपलब्ध नसतांनाही तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु बांधलेल्या या तलाठी कार्यालयाची मात्र तालुक्यातील काही तलाठ्यांना ॲलर्जी दिसून येते. काही गावे आत असल्याने तलाठी फक्त नावापुरतेच या गावामध्ये जात असल्याची माहिती आहे.
परिणामी खेड्यातील नागरिकांना कामासाठी जर तलाठ्यांकडे जायचे असेल तर मारेगावला जावे लागत असुन मारेगाव जाऊनही कधी कधी हे तलाठी भेटतीलच असे नाही. कधी नागरिक मारेगाव तर तलाठी गायब असे वास्तव आहे.
भ्रमनध्वनीवरून संपर्क साधला असता मी दुसऱ्या गावाला आहो असे उत्तर मिळते. त्यामुळे एखाद्या कामासाठी तलाठ्याकडे गेलेल्या नागरिकांना गेल्या पावलीच परत यावे लागते. त्यामुळे दिवसाचा वेळ वाया जातो. पैसा वाया जातो. आणि खर्च मात्र दुप्पट होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. कधी लिंक राहत नाही. अशा अनेक समस्याचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो.
अनेक तलाठ्यांकडे एकापेक्षा जास्त गावे आहेत. त्यामुळे आम्ही त्या कार्यालयात कसं राहायचं असा प्रश्न उपस्थित केला जातो. ज्या तलाठ्यांकडे एकापेक्षा अनेक गावे आहेत त्यांच्याकडे कोणत्या गावाला कधी जायचे याचे वेळापत्रक असायला हवे. परंतु दुसऱ्या गावाचा बहाणा सांगून काही तलाठी मारेगाव येथेच राहणे पसंद करतात.
त्यासाठी दोन ते तीन तलाठी मिळून त्यांची मारेगाव येथे रूम वजा कार्यालय आहेत. येथूनच ते त्यांच्याकडील असलेल्या गावांचा कारभार सांभाळतात. यातील काही तलाठी तर लांबवरून आपली कामे सांभाळत असल्याची माहिती आहे.