
– नागपूर-हैदराबाद महामार्गावरील घटना
– घोडदरा येथील रवी राऊत पिंपरी येथे अपघातात ठार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मुलीची तब्येत दाखविण्याकरीता मुलीसह सेवाग्राम येथे निघालेल्या वडीलांवर काळाने घाला घातल्याची दुःखद घटना ता. १८ जुन रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान नागपूर-हैदराबाद महामार्गावरील पिंपरी (पोहना) येथे घडली.ऐन “फादर्स डे” रोजी दोन्ही मुलींनी वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रवी राऊत (४०) रा.घोडदरा असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून आचल (१८) व अक्षरा (१५) अशी अपघातात किरकोळ जखमी असलेल्या त्यांच्या मुलींची नावे आहेत.रवी राऊत हे घोडदरा येथील सोसायटीत कार्यरत होते.
मुलीची तब्येत बरी नसल्याने ता. १८ जुन रोजीचे रात्री नातेवाईकांकडे मुक्काम करून आज ता. १९ जुन रोजी सकाळी मुलीला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखवायचे अशा नियोजनासह घोडदरा येथुन निघालेल्या रवी यांचेवर वेळेआधीच काळाने घाला घातला.
दरम्यान रवी हे ता. १८ जुन रोजी दुचाकीने दोन्ही मुलींसह नातेवाईकांकडे कूच करीत असता नागपूर- हैदराबाद महामार्गावरील पिंपरी (पोहना) नजीक रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची दुचाकी उसळली.यात ते रस्त्यावर कोसळले असता त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते घटनास्थळीच गतप्राण झाले.तर त्यांच्या दोन्ही मुली किरकोळ जखमी झाल्या.
अपघात होताच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी जखमींना प्राथमिक उपचाराकरिता वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असुन दोन्ही मुलींची प्रकृती बरी असल्याची माहिती आहे.ऐन फादर्स डे रोजी दोन्ही मुलींनी वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.