
– कचरा कुंडीच ‘कचऱ्यात’ : लक्ष देण्याची गरज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्वच्छ भारत अभियानाचा बिगुल वाजल्यानंतर शहरात सर्वत्र स्वच्छता होणे अपेक्षित असताना शहरातील जिल्हा परिषद शाळाच ‘घाणीच्या विळख्यात’ सापडल्याचे भीषण वास्तव आहे.शाळेच्या कुंपना भोवती पुरते घाणीचे साम्राज्य पसरले असून शाळेच्या बाहेर असलेली कचराकुंडीच कचऱ्यात दिसेणाशी झाली आहे.परिणामी प्रशासनाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची काही स्थानिक नागरिकांची ओरड आहे.
तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ म्हणून मारेगावची ख्याती आहे. चहू बाजूच्या परिसरातून दररोज शेकडो नागरिकांचे आवागमन शहरात सुरू असतानाच दर मंगळवारला भरणाऱ्या आठवडी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी उफाळुन येते.शहरातील आठवडी बाजारात सर्व दुरुन दुकानदार येऊन आपली दुकाने थाटतात.बाजार आटपुन स्वगृही परतताना मात्र हे दुकानदार दिवसभरात जमा झालेला दुकानातील कचरा तसाच सोडून देतात.
शहरात दररोज सकाळी नगरपंचायतची घंटा गाडी फिरते. परिसरातील कचरा संकलित करून डम्पिंग ग्राउंड वर घेऊन जाते.परंतु यातील बराचसा ओला कचरा जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीलगत तसाच सोडला जातो. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने हा कचरा सडून त्यावर अनेक जंतू तयार होवून मच्छरांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते.
शहरातील आठवडी बाजार परिसराच्या शेजारीच जिल्हा परिषद शाळा असल्याने या जंतू व मच्छरां मुळे रोगराई पसरुन चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिणामी प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद शाळेबाहेर कचराकुंडी बसवली आहे.परंतु कचराकुंडीच्या सभोवती ‘कचरा’ वाढल्याने तूर्तास ही कचराकुंडीच कचऱ्यात दिशेनाशी झाली आहे.नवलाईची बाब म्हणजे ही कचराकुंडी जिल्हा परिषद शाळेच्या अगदी प्रवेशद्वारा शेजारी आहे.
परिणामी शहरातील आठवडी बाजार परिसरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावुन ‘जिल्हा परिषद शाळेस मोकळा श्वास घेऊ द्यावा’ अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.