
— मारेगाव पोलीसात तक्रार, गुन्हा दाखल
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
काकाच्या घरी टीव्ही पाहायला गेलेल्या ग्रामीण भागातील
एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीला ता.२३ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते १२ वाजेदरम्यान फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या
घटनेने तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेली अल्पवयीन मुलगी एका शाळेत इयत्ता सात मध्ये शालेय शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे सदर मुलगी शेजारी असलेल्या काकाकडे ता. २३ सप्टेंबर रोजी रात्री टीव्ही पाहायला गेली. मात्र ती रात्री उशिरापर्यंत परत आली नाही. त्यामुळे वडिलांनी भावाला विचारणा केली.परंतू ती रात्रीच साडे दहा अकरा वाजता टीव्ही पाहुन घरी गेल्याचे भावाकडून सांगण्यात आले. रात्री व दुसऱ्या दिवशी ता.२४ सप्टेंबरला मुलीचा गावात व नातेवाईकांकडे शोध घेतला परंतू ती मिळाली नाही.
याच दरम्यान गावातील एक २० वर्षीय मुलगा घटनेच्या दिवसा पासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या मुलाने फूस लावून मुलीला पळविले असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी ता. २५ सप्टेंबर रोजी पोलिसात दिली. तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे करीत आहे.