
– बनावट ॲप चे प्रमाण वाढले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
कामात होणारी दिरंगाई टाळण्यासाठी तसेच कामाशिवाय व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी शासकीय स्तरावरून ‘ऑनलाइन’ कामांवर भर दिला जातोय.मात्र सोशल मीडियावर घरकुल,लॅपटॉप,सौर पॅनल, लोन यासारख्या फसव्या योजनांचे प्रमाण वाढले आहे.
या फसव्या योजनांची लिंक पाठवून नागरिकांची दिशाभूल केली जात असुन नागरिकांची व्यक्तिगत फसवणूक होत आहे.यासाठी पोलीस विभागाकडून नानाविध उपायोजना व जनजागृती सुरू असून सुद्धा बराच मोठा वर्ग ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहे.
शासकीय पातळीपासून ते ग्राम प्रशासनापर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सुरू आहे.याचाच फायदा घेऊन अनेक बनावट ॲप तयार करण्यात आल्या असून सदर ॲप ची लिंक सोशल मीडिया वरून फिरताना दिसते.परंतु या फसव्या लिंकमुळे अनेकांची फसगत होत असून काहींना याचा आर्थिक भुर्दंड बसुन प्रचंड नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
आपल्या सोशल मीडियावरती अनोळखी लिंक आल्यास त्या लिंक ला लगेच प्रत्युत्तर न देता सजग राहून सदर लिंकची योग्य शहानिशा करून नंतरच त्या लिंकला उत्तर देणे ही आधुनिक युगात महत्त्वाची बाब होऊन बसली आहे.