
– उकाड्याची काहीली मंदावली
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मृग संपुन आर्द्रा नक्षत्र प्रारंभ झाले असले तरी तप्त धरणी मायेला शांत करणारा मान्सून अद्याप बरसला नाही.परिणामी हतबल बळीराजाचे डोळे आभाळा कडे लागले असता गेल्या दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाल्याने उकाड्याची काहीली काहीशी मंदावली असल्याने पुढील काही दिवसात मान्सून बरसणार असल्याची चाहुल बळीराजास लागली आहे.
गेला कित्येक वर्षात न जाणवलेला उकाडा यावर्षी जुन महिन्यात जाणवला.’मे हिट’ नंतर ‘जुन वेव्ह’ ने अंग भाजून काढले.तप्त उन्हावर मान्सूनच्या सरी सावलीचे पांघरून घालतील असा कयास असताना मान्सूनने सर्वांनाच चकवा दिला. परिणामी मृग नक्षत्र कोरडे लोटुन आर्द्रा नक्षत्र सुरू झाले तरी पाऊस न बरसल्याने बळीराजा पुरता हातबल झाला.
दरम्यान गेल्या दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल होत निळ्याभोर गगनात काहीशे काळे ढग दिसायला लागले.कुठे तुरळक पावसाच्या सरी कोसळल्याने कोमेजलेल्या बळीराजाला जणू नवसंजीवनी मिळाली.खरिपाची घाई सर्वत्र सुरू झाली.
वातावरण बदलासह उन्हाची काहीली काहीशी मंदावल्याने मान्सून सरींचे संकेत मिळाले असून ‘लेट ये पण थेट ये’ अशी आर्तसाद बळीराजा वरून देवाला मनोमनी घालताना दिसून येत आहे.