
– मारेगाव तालुक्यातील ‘चोपन’ मुळ गाव
– चंद्रपूर येथे वास्तव्य : सुट्टी बेतली जीवावर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील चोपन येथील एका ३२ वर्षीय युवकाचा गडचांदूर येथील अमळनाला डॅम येथील डोहात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यदिनी’ दुपारी २:३० वाजे दरम्यान घडली.परिणामी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी युवकाच्या जीवावर बेतली असून या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सतीश शंकर चिंचोलकर (३२) रा.चोपन असे अळमना डॅम डोहात बुडून मृत्यू झालेल्या अविवाहित युवकाचे नाव आहे.सतीश हे चंद्रपूर येथे मयूर इंटरप्राईजेस कंपनीत डीलरशिपचे काम करीत होते.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने त्यांनी मित्रांसह गडचांदुर तालुक्यातील प्रसिद्ध अमळनाला डॅम येथे जाण्याचा बेत आखला. दुपारी २:३० वाजता पोहण्याच्या उद्देशाने सतीश यांनी पाण्यात उडी मारली. परंतु पाण्यात उडी मारलेले सतीश पाण्याच्या वर आलेच नाही.
यावेळी स्थानिक मासेमारांनी सतीश यांचा पाण्यात शोध घेतला असता काही वेळाने सतीश यांना अमळनाला डॅम डोहातून बाहेर काढण्यात आले.परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.विशेष म्हणजे सतीश यांना पोहता येत नव्हते अशी माहिती आहे.
ऐन तारुण्यात अविवाहित सतीश यांचे अशा दुर्दैवी मृत्युने चिंचोलकर परिवारावर पुरती शोककळा पसरली असून या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.