
– बोटोनी जंगल परिसरातील घटना
– नागरिकांत कमालीची दहशत
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील बोटोनी जंगल परिसरात वाघाने गाईवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली.या हल्ल्यात केवळ गाईचे नशीब बलवत्तर म्हणून गाय थोडक्यात बचावली असली तरी परिसरात वाघोबाचा कानोसा लागल्याने येथील नागरिकांत कमालीची दहशत पसरली आहे.
बोटोनी जंगल परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर हा नेहमीचाच आहे.अधून मधून या परिसरात वाघोबाचे दर्शन परिसरातील नागरिकांना नित्याचेच झाले आहे. परंतु पशुधनाला चराईकरिता याच परिसरात न्यावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांचाही नाईलाज आहे.
दरम्यान १ ऑक्टोबर रोजी दुपारी गुराखी अरुण नागोसे हे गुरांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले असता घनदाट जंगलाच्या आडोशाला दडी मारून बसलेल्या वाघोबाने गाईवर अचानक जीवघेणा हल्ला केला.या अनपेक्षित जीवघेण्या हल्ल्यात केवळ नशीब बलवत्तर म्हणून गाय वाचली.मात्र यावेळी गायीच्या मागील पायाला वाघाने चावा घेतल्याने गाय जखमी झाली.
वाघाने हल्ला केलेली गाय ही बोटोनी येथील रामलु टेकाम यांचे मालकीची असल्याची माहिती आहे.
तूर्तास भर दिवसा वाघाने गाईवर हल्ला केल्याने बोटोनी परिसरातील नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
“बोटोनी सर्कल परिसरात वाघाचा वावर असल्याचे आढळल्याने सदर परिसरातील नागरिकांनी जंगल परिसरात व शेतात जाताना सतर्कता बाळगावी.”
वनविभाग, बोटोनी सर्कल.