
– तालुक्यातील कानडा जि.प.शाळेतील प्रकार
– शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे : मारेगाव
जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थी नियमित शाळेत येऊन विद्यार्थी संख्या टिकून राहावी याकरिता शासन स्तरावरून तारेवरची कसरत सुरू असताना तालुक्यातील कानडा येथे ३ नोव्हेंबर रोजी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आहे.सरपंच भेटीत चक्क येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकच गैरहजर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.परिणामी शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
मारेगाव तालुक्यातील कानडा येथे जिल्हा परिषद शाळा आहे. शिक्षणाचे बाळकडू घेण्याकरिता येथे रोज चिमुकले येत असतात.
दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी कानडा येथील सरपंचा सौ.सुषमा रुपेश ढोके यांनी येथील जिल्हा परिषद शाळेला अकस्मात भेट दिली. यावेळी त्यांना शाळेतील विद्यार्थी पटांगणात खेळताना दिसून आले. सरपंचा सुषमा ढोके यांनी विद्यार्थ्यांना याबाबत विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षकच हजर नसल्याचे सांगितले. सदर बाबीची शहानिशा करण्याकरिता सरपंचा सुषमा ढोके यांनी कार्यालयात जाऊन बघितले असता तेथे एकही शिक्षक आढळून आले नाही.
नवलाईची बाब म्हणजे येथील गीते नामक शिक्षक दुपारी १२:४० मी.शाळेत हजर झाले.परिणामी कानडा येथील सरपंचा सौ.सुषमा रुपेश ढोके यांचेसह येथील पालकात स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांविरुद्ध कमालीची संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित विभागाने कर्तव्यात कसूर करून शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही मागणी कानडा येथील सरपंचा सौ.सुषमा रुपेश ढोके यांचेसह येथील नागरिकांनी व पालकांनी उचलून धरली आहे.