
— तहसील कार्यालयावर धडकला मशाल मोर्चा
— मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांचे मार्फत शिवसेचे निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मागील अनेक वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. सरकारकडून केवळ आश्वासनाची खैरात वाटली जात असुन कायमच उपेक्षित असलेल्या जनताजनार्दनास, शेतकरी शेतमजुरास न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने जिल्हा पक्ष प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात विविध मागण्या घेऊन तहसिल कार्यालयावर भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला असून शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
मारेगाव तालुका आदिवासीबहुल असुन विविध समस्यांनी ग्रासला आहे. मागील वर्षी तालुक्यात अतिवृष्टीने वर्धा नदीच्या महापुरात अनेक शेतकरी देशोधडीला लागले. तालुक्यात एकही कारखाना नसल्याने शेत मजुरीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अस्मानी तथा सुलतानी संकटाने मागील पाच सहा वर्षापासुन उत्पादनात सातत्याने घट येऊन शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्येचा आकडा फुगत आहे. याकडे मात्र शासन स्तरावरून ठोस उपाययोजना होताना दिसत नसुन आश्वासनाची खैरात दिल्या जात असल्याने दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खतांची आर्थिक मदत तातडीने जाहिर करावी, मागील वर्षीचा पिक विमा सरसकट देण्यात यावा, गेल्या वर्षी वर्धा नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या ११ गावांना वेगळी मदत देण्यात यावी, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा. घरगुती गॅसचे दर कमी करण्यात यावे, घरगुती विजेचे प्रति युनिट दर कमी करण्यात यावेत, या व विविध मागण्यासाठी, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात भव्य मशाल मोर्चा तहसीलदार यांचे दालनात पोहचला. व विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी पदाधिकारी व जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी भाषणातून सरकार वर ताशेरे ओढले.
यावेळी शिवसेना (उबाठा) उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, तालुका प्रमुख संजय आवारी, उप ता. प्र. राजू मोरे, नगराध्यक्ष डाॅ.मनीष मस्की, ता.संघटक सुनिल गेडाम, युवासेना ता. प्र.मयूर ठाकरे, युवा सेना श. प्र.गणेश आसुटकर, श. प्र. अभय चौधरी, उप सभापती कृ.उ.बा.स जीवन काळे, संचालक कृ.उ.बा.स. सुनिता मस्की, माजी नगराध्यक्ष रेखा मडावी, नगरसेविका माला बदकी, वर्षा किंगरे, राजू ठेंगणे, यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते तथा शेतकरी शेतमजुर उपस्थित होते.
या मशाल मोर्चात अनेक ट्रॅक्टर, बैल बंडी सह असंख्य शेतकरी शेतमजूर, बेरोजगार महिला पुरुषांनी स्वयंस्फुर्तीने हातात मशाल व भगवा झेंडा घेऊन जय भवानी जय शिवाजीच्या निनादात सहभाग दर्शवला. त्यामुळे परिसर शिवमय व भगवामय झाले होते.