
— युवक युवतीना प्रेरणा देणारा “स्केट फॉर युवा” अभिनव उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
बोटोणी येथील सात वर्षीय चिमुरडी मनस्वी येत्या २३ जानेवारी २०२५ रोजी चिं बोटोणी ते वणी ३० किमी अंतर स्केटिंग द्वारे पूर्ण करुन “स्केट फॉर युवा” हा प्रेरणात्मक संदेश “मनस्वी देणार आहे”. स्केटिंग रॅलीची सुरुवात बोटोणी येथून २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते राजु उंबरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखूवन होणार आहे.
(चिं) बोटोणी ता. मारेगाव येथील मनस्वी सध्या कोंढवा बुद्रुक, पुणे येथे वास्तव्यास असून मनस्वीने रोलर स्केटिंग मध्ये अनेक जागतिक विक्रम आपल्या नांवावर केले आहे. ती जगातील सर्वात लहान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असून इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट २०२१ , नॅशनल स्केटिंग चॅम्पियन २०२३ आणि नुकतेच सुवर्ण पदकाचे शतक पूर्ण केले आहे. मनस्वी नेहमीच एका नवीन विक्रमाला गवसणी घालत मारेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा घालत आहे.
यापुर्वीही मनस्वीने २६ जानेवारी २०२४ रोजी बोटोणी ते मारेगाव बेटी बचाओ – बेटी पढाओ करीता सलग १२ किमी स्केटिंग केले होते. आपल्या भागातील युवकांना आपल्या पासून प्रेरणा मिळावी व त्यांचा जास्तीत जास्त कल खेळाकडे व्हावा याकरिता मनस्वी सतत धडपडत आहे.
आता मात्र मनस्वी गगन भरारी घेत बोटोणी ते वणी ३० कि.मी. अंतर स्केटिंग करत अनेक दिग्गजांच्या साक्षीने ता.२३ जानेवारी रोजी करणार आहे. यावेळी वणी विधानसभा आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, कृउबा समिती सभापती गौरीशंकर खुराणा, संचालक महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ संजय खाडे, तहसिलदार उत्तम निलेवाड, ठाणेदार संजय सोळंके, लायन्स स्कुल वणी अध्यक्ष बलदेव खुंगर, बोटोणी सरपंचा सौ सुनीताताई जुमनाके , माजी प.स.सदस्या सुनीताताई लालसरे, स्केटिंग रॅली दरम्यान मनस्वीचे प्रशिक्षक विजयमलजी हे मनस्वीला विशेष मार्गदर्शन करणार आहे. स्केटिंग रॅलीचा समारोप शिवाजी पुतळा वणी येथे अंदाजे सकाळी १०.३० ते ११ वाजता दरम्यान होईल ,
स्केटिंग रॅली यशस्वी करण्यासाठी बजरंग दल ,गुरुदेव सेवा मंडळ, छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान, तथागत युवा मंडळ, माँ शेरा वाली क्रिकेट क्लब बोटोणी व बोटोणी येथील समस्त ग्रामस्थ याचे विशेष सहकार्य लाभणार आहे.