
– अखत्यारीत येणाऱ्या मागण्या मान्य करण्याची ग्वाही
– उद्या शेतकऱ्यांनी उपोषण मंडपात हजर राहण्याचे गौरीशंकर खुराणा यांचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यात वीज वितरण उपविभागाकडून सुरू असलेले लोड शेडिंग तात्काळ बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीने स्थानिक पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपा समोर २३ ऑक्टोंबर रोजी पासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.दरम्यान आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वीज वितरण उप अभियंत्यांनी उपोषण मंडपात भेट दिली.यावेळी काही मागण्या मान्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.उर्वरीत मागण्यांसाठी उद्या दुपारी वरिष्ठ येऊन आपणाशी चर्चा करतील अशा शब्द त्यांनी उपोषणकर्त्यांना यावेळी दिला.परिणामी कृ.ऊ.बा.स.सभापती गौरीशंकर खुराणा यांनी ऊद्या दुपारी तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांना उपोषण मंडपात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
गत काही दिवसापासून तालुक्यात विजेचा कमालीचा लपंडाव सुरू आहे.विज पुरवठा खंडित होण्याचे निश्चित असे वेळापत्रक नाही.त्यामुळे शेती पिकांना पाण्याची नितांत गरज असताना महावितरण कडुन मनमानी कारभार सुरू असुन या अनागोंदीत बळीराजाचे प्रचंड नुकसान होत आहे.
या विरोधात तालुका काँग्रेस कमिटीने ता.२३ ऑक्टोबर रोजी पासुन स्थानिक पोलीस वेल फेअर पेट्रोल पंपा समोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वीज वितरण कार्यकारी उप अभियंता शैलेन्द्र कुमार पाटील यांनी उपोषण मंडपात भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्ते मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मारुती गौरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा,अंकुश माफुर व युवक काँग्रेस मारेगाव तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी यांचेशी चर्चा केली.
यावेळी शैलेंद्र कुमार पाटील यांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या मागण्या तात्काळ सोडविणार असल्याचे लेखी दिले.परंतु काही मागण्या वरिष्ठांशी चर्चा करूनच सोडवाव्या लागतील असे ते म्हणाले.परिणामी “उद्या वरिष्ठ आपणास भेट देतील यातुन चर्चेअंती सकारात्मक तोडगा नक्कीच निघेल” असेही ते म्हणाले.
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर यांनी तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांना “आम्ही केलेल्या मागण्या व्यतिरिक्त आणखी काही मागण्या असतील तर उद्या उपोषण मंडपात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.”
परिणामी वीज वितरण वरिष्ठ उद्या उपोषणकर्त्यांशी चर्चा करतील असे संकेत मिळाले असून या उपोषणावर लवकरच तोडगा निघण्याची चाहूल लागली आहे. तूर्तास समस्त तालुका वासियांचे लक्ष उद्यावर लागले आहे.