
– वाटसरुंची तहान पाण्याच्या बाटलीवर
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
कडाक्याचा उन्हाळा,डोक्यावर रणरणत ऊन असतांना भर दुपारी शहरातील रस्त्यावर फिरलात तर घोटभर पाणी विकत घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. कारण शहराला ‘प्याऊ’ सत्कार्याचा विसर पडला असुन शहरातुन ‘पाणपोईच’ हद्दपार झाली आहे.
उन्हाळा आला म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आजकाल साद घालताना दिसुन येत आहे.मग यात सरकारी यंत्रणा कशा मागे राहतील…? त्यासुद्धा पुढे सरसावल्या.परंतु, हे सर्व होत असताना माणसांना पिण्याच्या पाण्याची आवश्यक सोय कमी झाल्याचे दिसते आहे.
पाणी पाजणे हे पुण्याचे कार्य म्हणून अनेक व्यक्ती व स्वयंसेवी संस्था पूर्वी अशा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय करायच्या. परंतु, आजकाल या संस्था याबाबतीत उदासिन दिसून येत आहेत.त्यांच्या या उदासीनतेचा लाभ मिनरल वॉटर विकनाऱ्यांना होत असून आता रस्तोरस्ती त्यांनी दुकाने थाटलेली दिसत आहे.
पाण्यासाठी तहानलेल्या जीवांना आता घशाची कोरड भागविण्यास पंधरा ते वीस रुपये मोजावे लागत असुन दिवसभर काबाडकष्ट करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या कष्ट- कऱ्याला तहान भागविण्यासाठी विकतचे पाणी घेणे कितपत परवडणारे आहे..? हा प्रश्न उपस्थित होतो.सहज शहरात फेरफटका मारला की फार तुरळक प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या सोई दिसून येतात.
”पाणी हेच जीवन” ,”पाण्याचे काम पुण्याचे काम” असे जरी म्हटले जात असले तरी आज पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईने सामान्य,कष्टकरी नागरिक हवालदिल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटंकती होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावर पाणपोई लावल्याचे चित्र आधी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते.
आता यांची संख्या कमी झाली आहे का…? कि वाटसरूस पाणी पाजण्याची आपली संस्कृतीच नामशेष होत आहे…? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वयंसेवी संस्था,तरुण मंडळे, लोकप्रतिनिधी तसेच नगर पंचायतने यासाठी पुढाकार घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी होताना दिसून येत आहे.