
– दारु भट्टी स्थानांतरणास परवानगी देण्यात येऊ नये : सर्वानुमते ठराव पारित
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरातील प्र.क्र.१२ येथील निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या इमारतीत दारूभट्टी स्थानांतरित होत असल्याची कुणकुण येथील नागरिकांना लागल्याने त्याविरुद्ध प्रचंड जन आक्रोश उफाळला होता.परिणामी येथील महिलांनी दारू भट्टी स्थलांतरा विरोधात नगरपंचायत,पोलीस स्टेशन सह जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले होते.अखेर महिलांच्या प्रयत्नांचे फलित होत १७ जुलै रोजीच्या न.प.च्या विशेष सभेत सर्वानुमते तसा ठराव पारित करण्यात आला आहे.
धार्मिक स्थळ असलेल्या शहरातील बुद्ध विहारा नजीक होत असलेल्या दारूभट्टीचे स्थानांतरणास येथील महिलांनी प्रचंड विरोध दर्शविला होता.सदर निवेदनाची दखल मारेगावचे नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की यांनी तात्काळ घेतली.यावेळी शहरातील सर्व १७ ही प्रभागाच्या नगरसेवकांना १७ जुलै रोजी विशेष सभा होणार असल्याची तडकाफडकी सूचना १४ जुलै रोजी देण्यात आली होती.१७ जुलै रोजीचे विशेष सभेत मुद्दा क्र. १ नुसार शहरातील प्र.क्र.१२ येथे दारुभट्टीचे स्थानांतरण होऊ दिले जाणार नसल्याचा ठराव १७ ही नगरसेवकांचे समक्ष मंजूर करण्यात आला.
काय आहे ठराव…!
येथील प्र.क्र.१२ मधील बुद्ध विहारा नजीक निर्माणाधीन इमारतीत दारूभट्टी स्थानांतरित करण्याचा प्रयत्न नियोजीत आहे.परंतु सदर ठिकाणी बिरसा मुंडा आदिवासी समाज सांस्कृतिक भवन प्रस्तावित असल्याने दारूभट्टी स्थानांतरणामुळे सद्भयस्थितीत व भविष्यात धार्मिक अशांतता,सामाजिक तेढ व नागरिकांना प्रचंड मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने १७ जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की यांचे उपस्थितीत कुठल्याही परिस्थितीत दारूभट्टीचे स्थानांतरणास परवानगी देण्यात येणार नाही असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला आहे.यावेळी मारेगावातील १७ ही नगरसेवकांची उपस्थिती होती हे विशेष.
परिणामी प्र. क्र.१२ येथील दारू भट्टीचे स्थानांतरणास येथील महिलांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे सार्थक झाले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.