
– वनोजादेवी येथील घटना
– एक दिवसा आधी दिले होते निवेदन
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
वनोजादेवी येथील महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांना निवेदन दिले होते २५ मार्च रोजी निवेदन देऊन वनोजादेवी येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री वर कारवाई करण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आली होती. निवेदन सादर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी २६ मार्च रोजी वनोजादेवी येथील रणरागिनींनी स्वतः अवैध दारू विक्रेत्याला दारू सह रंगेहात पकडून चोप देत अवैध दारू विक्रीला दणका दिला.
तालुक्यातील वनजादेवी येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री थांबवून दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी वनोजादेवी येथील महिलांनी २५ मार्च रोजी पो.स्टे.ला दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी गावात अवैध दारू विकली जात असल्याची माहिती महिलांना मिळाली असता महिलांनी घटनास्थळ गाठत दोन पेट्या दारूसह विक्रेत्याला रंगेहात पकडत चांगला चोप दिला.
अवैध दारू विक्रेत्याला चोप देऊन रविवारी रात्री उशिरा अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी वनोजादेवी येथील शेकडो महिला मारेगाव पोलीस ठाण्यावर धडकल्या असता पोलिसांनी त्वरित कारवाई करून अवैध दारू विक्रीला लगाम लावावा अशी मागणी पुनश्च एकदा करण्यात आली.
यावेळी वनोजा येथील सरपंच डीमन टोंगे, उपसरपंच प्रशांत भंडारी वनिता ढोके,सुषमा ढोके,अमृता ढोके,सिंधू सोनटक्के,चंद्रकला राजूरकर,सीमा शिंदे, प्रियांका बोढे,इंदिरा बरडे,विमल सातपुते, जोत्स्ना आस्वले,गिरजा राजूरकर,कुंता मोतेकर,परवीन शेख,मनीषा राजूरकर, सुनंदा राजूरकर,प्रशांत बोढे,गोवर्धन टोंगे यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.