
– जीवनावश्यक वस्तूसह पिकांचे प्रचंड नुकसान
– निवेदनातून तहसीलदारांना आर्जव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.परंतु येथून विसर्ग होत असलेले पाणी बेंबळा कालव्यात न सोडता ‘रामेश्वर’ गावात वळविण्यात आल्याने याची नाहक झळ येथील नागरिकांना बसली आहे. बेंबळा प्रकल्प कालव्याचे पाणी घरात शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंसह शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.परिणामी २८ जुलै रोजी येथील नागरिकांनी तहसील कार्यालय गाठत “बेंबळा प्रकल्प कालव्याचा विसर्ग गावात न करता कॅनल मध्ये वळता करावा” अशी आर्जव तहसीलदारांमार्फत बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली.
बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे.शेतकऱ्यांसाठी नेहमीच अमृत ठरत असलेला बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे यावर्षी मात्र मारेगाव तालुक्यातील ‘रामेश्वर’ वासियांवर कोपलेला दिसून येत आहे.
गत काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.परिणामी बेंबळा प्रकल्प धरणाचे दरवाजे उघडल्याने येथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परंतु बेंबळा प्रकल्पातून सोडलेले पाणी कॅनॉल मध्ये विसर्ग न होता ‘रामेश्वर’ गावातील घरात शिरल्याने येथील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
बेंबळा प्रकल्पाचे पाणी घरात शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंसह शेती पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.शेतांना पुरते तलावाचे रूप आल्याने पेरणी करणे शक्य नसल्याने ही बाब येथील नागरिकांनी वारंवार बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
परिणामी २८ जुलै रोजी रामेश्वर येथील नागरिकांनी तहसील कार्यालय गाठत पाण्याचा विसर्ग रामेश्वर गावात न करता कॅनॉल मध्ये करावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांमार्फत बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, सरपंचा निलीमा थेरे,आशिष खंडाळकर, चंद्रशेखर थेरे, विनोद चहानकर, चंद्रभान बेसेकर, राजू लांडे, संजय देवाळकर, मारोती उरकुडे, दिलीप ताजणे, विनोद एकरे, प्रफुल उरकुडे, प्रफुल पाटील यांचेसह रामेश्वर येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.