
— राळेगाव येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत स्वतः पोहचुन त्यांच्या मुलभुत समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी राळेगाव येथे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
दरम्यान जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत ता. ९ ऑगस्ट रोजी ११ वाजता महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी समाज बांधवांचे श्रद्धास्थान भगवान बिरसा मुंडा, अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन, ज्येष्ठ शेतकरी संघर्ष योद्धा (हिवरादरणे) बाबासाहेब दरणे पाटील यांचे हस्ते तथा आदिवासी नेते एम. के. कोडापे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक राळेगाव बाबा कबीरदास नगराळे, बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष सुधीर पाटील जवादे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रहमान अली मेहमूद अली यांच्या प्रमुख उपस्थितीत, जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सकाळी ११ वाजता पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक म्हणून माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी राळेगाव मतदार संघ हा मागील चार दशकांपासून विकासाच्या दृष्टीने वंचित असल्याचे सांगत सर्वसामान्य जनतेच्या समस्या ह्या आजही जैसे थे आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच गाव पाड्यांना भेटी दिल्या त्यावेळी हे विदारक वास्तव बघायला मिळाले. म्हणून एखाद्या रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचता यावे यासाठी निशुल्क रुग्णवाहिका दिली असुन पावसापासून बचाव करता यावा यासाठी अनेक गरजुंना रेनकोट सुध्दा देण्यात आल्याचे मेश्राम यांनी सांगीतले. गाव पाड्यांत वास्तव्य असलेल्या सर्वसामान्य जनतेची ही व्यथा म्हणजे माझी स्वतःची व्यथा असुन यापुढे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मी नेहमी कटिबद्ध असल्याचे अभिवचन माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितीतांना व राळेगाव विधान सभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेस दिले, मात्र यासाठी जनताजनार्दनाचा आशीर्वाद सदैव पाठीसी असावा जेणेकरुन आपली आशीर्वाद रुपी उर्जा विधायक कार्य करण्यासाठी प्रेरित करेल. आपला आशीर्वाद नक्कीच असेल असा आशावाद सुध्दा माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी व्यक्त केला.
जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर गरजु बांधवांना टी-शर्ट , स्पर्धा परिक्षेची आवड असणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना एम.पी. एस. सी. पुस्तकाचे वितरण, व ५० विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वितरण करण्यात आले. यावेळी राळेगाव विधान सभा क्षेत्रातील शेतकरी शेतमजुर, बेरोजगार,व सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.