
– पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राज्य शासनाने घेतलेला राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा कुलूप बंद करण्याचा निर्णय हा अयोग्य असून असे झाल्यास गोरगरिबांची मुले शिक्षणापासून कायम वंचित राहतील.या निर्णयाचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव निषेध करत असून संबंधित आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
समाजातील सर्वात खालच्या स्तरातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देता यावे याकरिता सर्व शिक्षा अभियान ही योजना राबविण्यात आली. ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देता यावे हा या योजनेचा मुख्य उद्देश.या योजनेचा लाभ समाजातील सर्वात खालच्या घटकापासून ते वरच्या घटकातील मुलां-मुलींना झाला. प्राथमिक शिक्षणाचे मोफत सार्वत्रिकीकरण करण्यात आल्याने खेडोपाडी शेकडो शाळा वसविला गेल्या.परिणामी शैक्षणिक प्रवाहापासून दूर ताणली गेलेली मुले सदर योजनेमुळे शैक्षणिक प्रवाहात आली.
नुकताच राज्य शासनाने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शेकडो गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून कायम दूर राहावे लागणार आहे.हा निर्णय पूर्णतः चुकीचा असून आम्ही याचा निषेध करतो अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव यांचे वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रा.भास्कर धानफुले, जिल्हा प्रभारी मोरेश्वर ठाकरे,तालुका अध्यक्ष भास्कर राऊत, सचिव गजानन देवाळकर,उपाध्यक्ष धनराज खंडरे ,तालुका कार्याध्यक्ष सुरेश नाखले, माजी तालुकाध्यक्ष सुमित हेपट, तालुका सहसचिव सुमित गेडाम, तालुका कोषाध्यक्ष भैय्याजी कनाके, तालुका संघटक गजानन आसुटकर, प्रसिद्धी प्रमुख आनंद नक्षणे यांचेसह सुरेश पाचभाई,शरद खापणे आदी उपस्थित होते.