
– मजुराची कन्या झळकली प्रथम श्रेणीत
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नुकताच इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला.यात कुठे ९२ टक्के तर कुठे ९०% गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगान होतानाचे चित्र सर्वत्र दिसून आले.पण यातील एक निकाल हा लक्षवेधी ठरला.प्रांजली विठ्ठल रामपुरे ६७%…! अवघे ६७ टक्के असताना का बरं उहापोह…? कारण ६७% गुण घेत प्रथम श्रेणीत येणारी ‘ती’ शेतमजुराची कन्या खरंच कौतुकास पात्र आहे.
मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा हे प्रांजलीचे गाव.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई-वडील मिळेल तिथे शेतमजूर म्हणून काम करतात.कामाच्या शोधात आज या गावी तर उद्या त्या गावी असाच त्यांचा प्रपंच.कोण्या एका गावात काम मिळाले तर तिथेच मुक्काम.तोही शेतात.पण अल्पशिक्षित असलेल्या प्रांजलीच्या आई-वडिलांची एकच इच्छा…आमची मुलगी शिकावी…शिकून खुप मोठी व्हावी.
मुक्कामाचा ठाव ठिकाण नसल्याने स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला ठेवायचे कुठे…शिकवायचे कसे… असंख्य प्रश्न उभे असताना त्यांनी प्रांजली मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात टाकले. शेजारीच असलेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात ‘ती’ वास्तव्य करू लागली.
सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेली प्रांजली परीक्षेत नक्कीच टॉप करणार अशी येथील शिक्षकांना अपेक्षा होतीच.झालेही तसेच.इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.यात प्रांजली विठ्ठल रामपुरे या विद्यार्थिनीने ६७% घेत शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.कुठल्याही शिकवणी वर्गात न जाता.
आधुनिकतेचा पगडा ओढलेल्या हायटेक जमान्यातील काही पांढरपेशा मॉडर्न लोकांना प्रांजलीचे हे ६७% थिटे वाटत असले तरी त्या ६७ टक्क्यामागे असलेल्या प्रांजलीच्या आई-वडिलांची तसेच प्रांजलीची प्रचंड मेहनत विसरून चालणार नाही.त्यांच्यासाठी प्रांजलीचे हे ६७% च ९७% होय.घरात कुणीही शिक्षित नसताना, किंबहुना स्वतःच्या घराचा ठावठिकाणा नसताना प्रांजलीने मिळवलेले हे यश खरंच कौतुकास पात्र आहे.
हा शेवट नक्कीच नाही…ही सुरुवात आहे.यापुढे शिक्षणरूपी प्रवासात प्रांजलीला अनेक टप्पे पार करावयाचे आहे.पहिल्या पायरीवर ती दिमाखात चढली असली तरी अशा असंख्य पायऱ्या तिच्या वाटेत कायम उभ्या राहणार यात तीळमात्रही शंका नाही.आपला यशाचा हा वसा प्रांजली असाच सुरू ठेवेल हीच अपेक्षा…!
मोठे होऊन प्रशासकीय अधिकारी बनावयाचे असून एक चांगला अधिकारी बनुन जनसामान्यांची सेवा करण्याची इच्छा प्रांजलीने तिच्या शिक्षकांजवळ व्यक्त केली आहे. प्रांजली उराशी बाळगत असलेले स्वप्न सत्यात उतरो या अपेक्षेसह तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊया….!