
– तालुक्यात अवकाळीचा आतंक
– शेतीकामांसह लग्न समारंभांची पुरती वाट
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
ऐन उन्हाळ्याचे दिवस असताना गेल्या महिनाभरापासून तालुक्यावर अवकाळी कोपला आहे. यात वादळी वाऱ्याने तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड नुकसान होत शेती कामांसह लग्न समारंभाची पूरती वाट लागली असून ‘जारे जारे पावसात तुला देतो पैसा’ असे म्हणावयाची वेळ तालुक्यातील नागरिकांवर येऊन पडली आहे.
दरम्यान ता.२ मे चे मध्यरात्री अवकाळीने शहरासह परिसर झोडपून काढला.कोरड्या नाल्यांना जलसंजीवनी मिळाल्याने नाले खळखळून वाहू लागले असले तरी सततच्या पावसाने जनसामान्य पुरते त्रस्त झाले आहे.
उन्हाळा म्हटला की सगळीकडे तयारी असते ती नटून थटून लग्न समारंभाला जाण्याची. यात एप्रिल-मे महिना म्हणजे लग्नात नाचणाऱ्यांची मज्जाच. पण गेल्या महिनाभरापासून तालुक्यावर अवकाळी कोपल्याने नाच शौकिनांचा पुरता हिरमोड झाला असुन सततच्या रीप-रिपीने बळीराजाही हवालदील झाला आहे.
यात कुरडया-पापड वाळविण्यासाठी सूर्य देवाची आतुरतेने वाट बघणाऱ्या भगिनींचे दुःख शब्दात वर्णन न करता येण्याजोगे आहे.
तालुक्यात महिनाभरापासून अवकाळीची ये-जा अविरत सुरू आहे.सकाळी थंडी दुपारी ऊन आणि रात्री पाऊस असे वेळापत्रक निसर्गाने बनविले असल्याने नेमका ऋतू कोणता सुरू आहे हे कळेनासे झाले असुन गमतीनेच का होईना ‘जारे जारे पावसा तुला देतो पैसा’ असे सर्वसामान्य मनोमनी पुटपुटताना दिसून येते आहे.