
– तीव्र पाणीटंचाईने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
– पाच दिवस उलटूनही तोडगा नाही
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
गेल्या पाच दिवसा पासून प्रभाग क्र.१६ स्थित बोअर नादुरुस्त असल्याने शहरातील काही प्रभागातील पाणी पुरवठा खंडित झाला आहे.पाच दिवस उलटूनही प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसत असून नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १६ स्थित असलेली बोअर गेल्या पाच दिवसापासून बंद असल्याने येथील प्रभाग क्र.१६,१५,८ व १४ येथील पाणीपुरवठा खंडित झाला आहे.पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असून लोकप्रतिनिधींकडून एका टँकरने संपूर्ण प्रभागाच्या ‘घशाची कोरड’ भागविण्याचा प्रयत्न केला जात असुन नागरिकांमध्ये प्रशासना विरुद्ध कमालीचा रोष निर्माण झाला आहे.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या पाच दिवसापासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असताना बोअर दुरुस्तीचे काम कासव गतीने होत असल्याने सर्वसामान्यांचा रोष विकोपाला गेला असून नागरिक आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या पवित्र्यात आहे.
बोअरची फ्लशिंग सुरू असून आज चार वाजेपर्यंत मोटरची ट्रायल घेण्यात येईल.यात अडचण आल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून संबंधित वॉल्व्ह दुसऱ्या मोटरला जोडण्याचा प्रयत्न सुरू असून आज काम १००% फत्ते होईल.
जितेंद्र नगराळे
नगरसेवक,पाणीपुरवठा सभापती नगरपंचायत,मारेगाव.