
– शेकडोंचा जनसागर पंचायत समितीवर धडकला
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या वागदरा साज्यात ४ गावांचा समावेश होतो.येथील गट ग्रामपंचायतच्या जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारती मधुन काही जिवीतहानी होण्याआधी ग्रा.प.वागदराचे कार्यालय वागदरा येथील समाज मंदिरात हलविण्यात यावे व ग्रा.पं.च्या नियोजित ईमारतीचे बांधकाम वागदरा येथेच करण्यात यावे अशा आशयाच्या निवेदनासह शेकडोंचा जनसागर ४ सप्टेंबर रोजी पं.स.वर धडकला.
मारेगाव तालुक्यातील वागदरा येथील गट ग्रामपंचायतचे राजकारण चांगलेच तापले आहे. वागदरा गट ग्रामपंचायत मध्ये वागदरा,दुर्गाडा,कान्हाळगाव व वसंतनगर या चार गावांचा समावेश होतो.दरम्यान वागदरा येथील गट ग्रामपंचायतचे कार्यालय वसंत नगर येथे हलविण्याच्या हालचालींना वेग आल्याचे प्रतीत होताच येथील नागरिक आक्रमक झाले आहे. परिणामी शेकडो महिला व नागरिकांचा जत्था ४ सप्टेंबर रोजी स्थानिक पंचायत समिती कार्यालयावर धडकला.
यावेळी दिलेल्या निवेदनात वसंत नगर गावाचा आदिवासी गाव म्हणून समावेश होत नसुन लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला असता २०११ च्या जनगणनेनुसार वागदरा येथील लोकसंख्या ही वसंतनगर येथील लोकसंख्येपेक्षा जास्त असुन भौगोलिक दृष्ट्याही वागदरा हे ठिकाण सोयीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
२८ ऑगस्ट रोजी ग्राम पंचायत वागदरा येथील मासिक सभेनुसार नियोजित ग्रामपंचायत इमारत हजर सदस्याच्या एकूण ९ सदस्यांपैकी ६ विरुद्ध ३ बहुमताने असा ठराव पारित झाला की नियोजित ग्रामपंचायत इमारत वागदरा येथे गावठाण क्षेत्रात बांधकाम करण्यात यावे असे ठरविण्यात आले होते.परंतु असे असताना वागदरा येथील गट ग्रामपंचायत कार्यालय वसंत नगर येथे हलविण्याच्या हालचालींना का वेग येतोय हे उलगडणारे कोडे होऊन बसले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निसर्ग नियमाप्रमाणे आईच्या उदरातून मुलाचा जन्म होतो तेव्हा नामकरण मुलाचे केले जाते आईचे नाही. म्हणजेच मूळ वागदरा गावातून वसंतनगर आले आहे.नामकरण वागदराचे नाही तर वसंत नगरचे झाले. १९८६ च्या आधी वसंत नगर हे गाव ग्रामपंचायत वाघदरा पंचायत समिती मारेगाव, जिल्हा यवतमाळ कुठे होते…? हे सिद्ध करण्यात यावे अशीही बाब सदर निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
तूर्तास वागदरा येथील गट ग्रामपंचायतची इमारत जीर्ण व मोडकळीस आली असल्याने ग्रामपंचायत कार्यालय वागदरा येथीलच समाज मंदिरात हलविण्यात यावे व ग्रामपंचायतचे नियोजित इमारत बांधकाम वसंत नगर येथे न करता मुळगावी वागदरा येथेच करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन ४ सप्टेंबर रोजी वागदरा ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिले.
यावेळी शेकडो वागदरा वासियांसह दुर्गाडी,कान्हाळगाव येथील महिला व नागरिक उपस्थित होते.