
– गुरुदेव महीला भजन मंडळाचा विशेष पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सिंदी येथे ता.१ ऑक्टोबर रोजी ग्राम हिताच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, हळदीकुंकू आदींचा समावेश होता.यात अवघ्या गावातील ग्रामस्थांचा सहभाग असला तरी येथील गुरुदेव महिला भजन मंडळाच्या भगिनींनी यात विशेष पुढाकार घेतला होता.
तालुक्यातील अनेक गाव खेड्यात गुरुदेव भजन मंडळ कार्यरत आहे. आपल्या भजनातून जनजागृती करणे हे गुरुदेव भजन मंडळाचे मुख्य कार्य व हाच उद्देश.सोबतच ग्राम हिताचे विविध कार्यक्रम राबवून आपल्या गावाच्या विकासाचा आलेख वाढीवर नेण्याचा प्रयत्न गुरुदेव भजन मंडळाचे सदस्य करीत असतात.
दरम्यान तालुक्यातील सिंदी येथे ता.१ ऑक्टोबर रोजी गुरुदेव महिला भजन मंडळाच्या भगिनींनी ग्रामहिताचे अनेक कार्यक्रम राबविले.यात गावातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले.गावातील कचरा गोळा करुन ग्रामस्वच्छता करण्यात आली तसेच महिला भगिनींतील एकी कायम असावी याकरिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
गुरुदेव महिला भजन मंडळाच्या विशेष पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला असला तरी यात सिंदी येथील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या आनंदाने व हिरीरीने सहभाग घेऊन ग्राम हिताच्या कार्यात खारीचा वाटा उचलला.
यावेळी गुरुदेव महिला भजन मंडळाच्या अध्यक्षा सौ.देविका डाहुले, सचिव सौ.रंजना राउत यांचेसह सौ.आशा राउत,सौ.सविता नेहारे,सौ.विजया गोहोकार,सौ.सुशिला ढवस तसेच सिंधी येथील शेकडो नागरिक व भगिनी उपस्थित होत्या.