
– अखेर अनुसया बाईंचे आमरण उपोषण मागे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गट क्रमांक ८२ मधिल फेरफार क्रमांक ४४१ रद्द करून फेरफार क्रमांक ४०१ कायम करुन सात बारा मध्ये दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी ७६ वर्षीय अनुसयाबाईंनी ता.१३ सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणाचे’ हत्यार उपसले होते.उपोषणाच्या आठव्या दिवशी अखेर मनसेनेते राजू उंबरकर यांच्या आदेशाने मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी मारेगाव तहसीलदारांशी सविस्तर चर्चा करून सदर उपोषणावर तोडगा काढल्यानंतर प्रीतम राजगडकर यांनी अनुसयाबाईस ज्यूस पाजुन आमरण उपोषणाची सांगता झाली.
अनुसयाबाई जहांगीर फुलझेले (७६) रा.डोरली ही वृद्धा १३ सप्टेंबर रोजी पासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली होती. गट क्रमांक ८२ मधील फेरफार क्रमांक ४४१ रद्द करून फेरफार क्रमांक ४०१ कायम करून सातबारा दुरुस्ती करण्यात यावी ही प्रमुख मागणी अनुसया बाईंनी उचलून धरली होती.
आमरण उपोषणास तब्बल ७ दिवस उलटूनही अनुसया बाईंच्या उपोषणावर तोडगा निघाला नव्हता. दरम्यानच्या काळात ७६ वर्षी वृद्धेची प्रकृतीही कमालीची खालावली होती. परिणामी ता. २० सप्टेंबर रोजी मनसे नेते राजू उंबरकरांच्या आदेशाने तालुका शाखा मनसेने उपोषण मंडपात भेट दिली. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी मारेगाव तहसीलदारांशी सदर उपोषणाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी सदर प्रकरण त्यांचे अवाक्यात येत नसून अनुसया बाईंनी सक्षम अधिकारी यांचे कडे सदर प्रकरणाबाबत अपील करावी… त्यानंतर आम्ही योग्य ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
तहसीलदार उत्तम निलावाड, निवासी नायब तहसीलदार मडकाम मॅडम, नायब तहसीलदार मत्ते, पुरवठा निरीक्षक रमेश वाढवे, प्रीतम राजगडकर यांनी अनुसयाबाईस ज्यूस पाजुन तब्बल आठव्या दिवशी मनसे पक्ष नेते राजू उंबरकर तसेच तालुका शाखा मनसेच्या मध्यस्थीने सदर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, नगरसेवक अनिल गेडाम उपस्थित होते.