
– शब्दात वर्णन न करता येणारी ‘माय’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
संपादकीय लेख – प्रफुल्ल ठाकरे
मानवी नातेसंबंधातील आणि जगातील वेगळ्या नात्यातील एक नात आईचं. आई आणि मुलांच्या नात्याचे बंध म्हणजे अमूल्य प्रेमाची ठेव. आईची माया, प्रेम तिच्या मुलांच्यावरील मायेची तुलना जगातील कुठल्याच, कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. आईच्या पोटी एकदा मुलं जन्माला आलं की, मग तिचं सगळं आयुष्य मुलासाठीच देऊन टाकते.
आज मदर्स डे…तीच पाडस भर रस्त्यात निपचित पडून अन् ती धडपडतेय मदती साठी. आईच प्रेम निस्सीम असतं.मग ते मानवातील असो अथवा जनावरातील.मदर्स डे च्या दिवशी मायेच हे प्रेम , आपल्या पाडसाचा जीव वाचवण्याची केविलवाणी धडपड टिपलीय लोकशस्त्रने…!
शहरातील नायरा पेट्रोल पंप लगत असलेल्या गोठ्यात रविवारी सकाळी काही जनावरे जात असता एका अज्ञात वाहनाने राज्य महामार्गावरील मारोबा मंदिरा नजीक एका गाईच्या वासरास जबर धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की अवघ्या क्षणात ते वासरू रोडच्या मधोमध निपचित पडले.त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागले.एक डोळा फुटल्याने ते अंध झाले. वासरास धडक देताच निर्दयी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.
विपचित पडलेले ‘तीचे ‘वासरू रोड वरती विव्हळत होते. सोबतच्या असंख्य जनावरांनी त्या वासरास गराडा घातला. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी वासराच्या तोंडात पाणी घातले. काहींनी वासरास उपचारार्थ हलविण्यासाठी इकडे तिकडे फोन लावून प्रयत्न सुरू केला.
‘ती माय’ मात्र येणाऱ्या प्रत्येक वाहनास आडवी जात होती. जणू अबोल शब्दात मदत मागत होती.मायच ती… आपल्या लेकरासाठी केविलवाणी धडपड करत होती. हा सर्व प्रकार बघ्यांचे मन सुन्न करणारा होता.
आज मदर्स डे…आईचा गौरव करण्याचा दिवस. आई हा शब्द करुणा, प्रेम, धैर्य आणि दयाळूपणाचे प्रतीक…आई क्षमाशील, निस्वार्थी असते हे वेगळं सांगायची गरज नाही.प्रत्येकाची आई आपल्या मुलांना जीवापाड जपत असते, मुलांच्या सुखासाठी ती स्वत:चं आयुष्य झिजवत असते.आई ही प्रत्येकाच्या जीवनाचा आधारस्तंभ असते. अशा या आईच्या उपकाराची जाणीव ठेवून जगभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृत्व दिन साजरा केला जातो.उगाच म्हटले जात नाही…..स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी….!