
– क्रीडा संकुलाचे काम जलद गतीने पूर्ण करा : आ.संजीवरेड्डी बोदकुरवार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील क्रीडा संकुलाची वाट मोकळी झाली असून क्रीडा संकुलाची कामे जलद गतीने मार्गी लावण्यासंबंधीची सभा येथील विश्रामगृहात २२ जून रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत पार पडली.यावेळी तालुका क्रीडा संकुलाचे काम जलदगतीने पुर्ण करण्याच्या सुचना विद्यमान आमदारांनी उपस्थितांना दिल्या.
गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न ऐरणीवर होता. तालुक्यात क्रीडा संकुल उभे राहावे याकरिता यापूर्वी प्रयत्न झाले होते.परंतु आता मात्र त्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळत असल्याचे दिसत आहे.क्रीडा संकुलाची वाट मोकळी होत तालुका क्रीडा संकुलाची जागा निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान २२ जून रोजी क्रीडा संकुलाचे जागेची प्रत्यक्ष पाहणी तसेच सीमांकन करून मारेगावातील विश्रामगृह येथे क्रीडा संकुलाच्या बांधणी बाबत सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी सर्व प्रशासकीय बाबींची पाहणी करून निविदा प्रक्रिया राबवून क्रीडा संकुलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे सह तालुका संकुल समिती अध्यक्ष तहसीलदार यु.एस.निलावाड, सा.बां.उपविभागिय अभियंता मोचेवार,सा.बां.शाखा अभियंता आसुटकर,तालुका क्रीडा अधिकारी मिलमिले, कार्याध्यक्ष,नगरसेवक वैभव पवार आदी उपस्थित होते.