
– रेशन कार्ड धारकांना लाभ
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
सण-उत्सव काळात रवा, चणा डाळ, पामतेल व साखर अशा चार वस्तूंची किट अवघ्या शंभर रुपयांत रेशन दुकानांमार्फत गरजूंना उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.त्या अनुषंगाने मारेगावातील सुरेंद्र लिहितकर यांच्या स्वस्त धान्य दुकानात ११ एप्रिल रोजी लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप करण्यात आले.
राज्यातील सर्वसामान्य, गोरगरिबांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. सर्वसामान्यांचा सण-उत्सव गोड व्हावा या उद्देशाने राज्य शासनाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘आनंदाच्या शिधा’ वाटपाचे नियोजन केले होते.
मात्र सरकारी कर्मचार्यांच्या संपामुळे या शिधावाटपाला उशीर झाला होता. आनंदाच्या शिधा वाटपाला अखेर मुहूर्त मिळाला असून मारेगावातील सुरेंद्र लिहितकर यांचे स्वस्त धान्य दुकानात ११ एप्रिल रोजी लाभार्थ्यांना ‘आनंदाच्या शिधा वाटपाचे’ किट वितरित करण्यात आले.
यावेळी शेकडो लाभार्थ्यांनी ‘आनंदाचा शिधा’ किटचा लाभ घेतला.