
– मार्डी रस्त्यावर शेकडो बैल जोड्यांची शिस्तबद्ध रीघ
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
सर्वत्र बैलपोळ्याच्या आनंदाला उधाण आले असताना मारेगावातही १४ सप्टेंबर रोजी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील मार्डी रस्त्यावर शेकडो बैल जोड्यांची लक्षवेधी रीघ लागली होती. प्रभात फेरीनंतर आरती करून किन्हेकार यांच्या बैल जोडीने तोरणाची माळ तोडून बैलपोळ्याची सांगता करण्यात आली.
दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात.पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बळीराजाचा मित्र असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व प्रेम व्यक्त करणे हा या दिवसा मागील प्रमुख हेतू आहे.
दरम्यान १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहरातील मार्डी रस्त्यावरती बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मार्डी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी शेकडो बैल जोड्यांची मनमोहक व शिस्तबद्ध रीघ लागली होती.
रीतीरीवाजाप्रमाणे प्रभात फेरी नंतर आरती करून धीरज किन्हेकार यांच्या बैल जोडीने तोरणाची माळ तोडली.तत्पुर्वी शहरातील शेकडो बैल जोड्या स्वगृही पुजे करिता रवाना झाल्या होत्या.
बैल पोळ्या निमित्त शहरातील मार्डी रस्त्यावर नागरिकांसह बालगोपालांची प्रचंड गर्दी बघावयास मिळाली.पोळ्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तकडा बंदोबस्तही यावेळी दिसून आला.