
— शहरवासीयांनी जपली परंपरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
चैत्र शु. नवमी ता ६ एप्रिल रविवारला प्रभू श्रीराम नवमी उत्सव तथा भव्य शोभायात्रेचे परंपरा जपत, शोभायात्रा समितीतर्फे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त मारेगाव नगरीत रामरथाचे आयोजन करून भव्यदिव्य शोभायात्रा शहरातुन काढण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळत आहे.
या शोभायात्रेमध्ये विविध देखावे असुन, अयोध्येतील रामलल्लांची देखणी मूर्ती, आणि हनुमान यांच्या मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच, मारेगाव शहराला भजनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी ग्रामस्थ,या शिवाय रामपालखी, घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह शोभायात्रेत सहभागी होणार असून नगर पंचायत जवळील हनुमान मंदिर येथे संध्याकाळी पाच वाजता प्रभू श्रीरामांच्या रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आयोजन समितीकडुन कळविण्यात आले आहे.
या मार्गाने निघणार शोभायात्रा
■ ही शोभायात्रा हनुमान मंदिर नगर पंचायत मारेगाव येथून सुरू होऊन मार्डी चौक, स्टेट बँक मार्ग, राष्ट्रीय विद्यालय, बस स्थानक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बाळासाहेब चौक, मार्गे पुन्हा हनुमान मंदिर येथे पोहोचेल आणि महाआरतीने समारोप होईल. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभाग घ्यावा, अशी विनंती श्री प्रभू राम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांनी केली आहे .