
– वाहनधारकांसह पायदळ चालणे सुध्दा कठीण
– ध्वनिक्षेपकांच्या कर्ण कर्कश आवाजात केली जाते विक्री
– स्थानिक प्रशासनाकडुन होतेय् डोळेझाक
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगांव शहरात दर मंगळवारला आठवडी बाजार भरत असुन,बाजाराची ठराविक जागा सोडुन मार्डी रोडवर दुकानदार भर रस्त्यावर आपले बस्तान थाटत असल्याने,तथा मारेगाव मार्डी मार्ग हा सतत वाहतुकीचा असल्याने बाजाराच्या दिवशी या मार्गावर तोबा गर्दी होते.
त्यामुळे वाहनधारकांसह पायदळ चालणाऱ्यांना सुध्दा कमालीचा त्रास सहन करावा लागतो.याच सोबत दुकानदारांकडुन छोट्या ध्ननि क्षेपकावरुन कर्ण कर्कश आवाजात फळ भाजीची विक्री होत असल्याने गिर्हाईकांना अत्याधिक प्रमाणात त्रास होत असला तरी स्थानिक नगर पंचायत प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन डोळेझाक करत असल्याचे जन मानसातुन बोलल्या जात आहे.
तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ मारेगाव असुन शहरासह खेड्यावरुन बाजाराकरीता येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. दर मंगळवारी मारेगाव येथे मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरत असतो. या आठवडी बाजारासाठी नगरपंचायतने जागाही उपलब्ध करून दिली आहे.
धकाधकीच्या जीवनशैलीमूळे आज बहुतांश लोकांना बाजारात जाऊन खरेदी करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकजण रस्त्यावर खरेदी करून घर गाठणे पसंत करतात. ग्राहकांची ही गरज ओळखून सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनी आता आपली दुकानदारी रस्त्यावर आणली आहे.अलीकडे काही फळ, भाजी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्रेत्यांनी वाहनावर स्पीकर लावून व ठिकठिकाणी वाहने उभी करून विक्री सुरू केली आहे.
शहरातील रस्ते वाढत्या दुकानांमुळे आकुंचन पावली आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर चारचाकी वाहने सोडा टूव्हीलर घेऊन चालणे कठीण असते. रस्त्यावरील दुकानामुळे शहरातील वर्दळीचे रस्ते ठप्प होतात. यामुळे नागरिक वैतागले आहे.
मारेगाव-मार्डी हा वर्दळीचा रस्ता असुन याच मार्गावर शासकीय ग्रामिण रुग्णालय असल्यामुळे कोणत्याही क्षणी रुग्णाला दवाखाण्यात उपचारासाठी जावे लागते.मात्र मंगळवारला या रस्त्यावरुन बाजार भरल्यावर रुग्णालयात अती तातडीने नेण्यास अडथळा होत असतो. परंतु स्थानिक प्रशासनाकडून मात्र जाणीवपुर्वक डोळेझाक होत असल्याचे आता जनतेमधुन बोलल्या जात असुन संताप व्यक्त केला जात आहे.