
— तालूका जनहित कल्याण संघटनेचे तहसिलदारांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात अनेक घरकुल लाभार्थी असुन रेती मिळत नसल्याने अनेक लाभार्थी शासकीय योजनेंतर्गत मिळालेले घरकुल बांधु शकत नसल्याचे विदारक वास्तव आहे. घरकुल लाभार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन रेती उपलब्ध करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या मार्गदर्शनात तालूका अध्यक्ष समिर कुडमेथे, उपाध्यक्ष राॅयल सय्यद, तथा सचिव निलेश तेलंग याच्या नेतृत्वात तहसिलदारांना देण्यात आले.
निसर्गाच्या वरदहस्ताने तालुक्यात रेतीचे मोठे साठे आहे. रेतीला दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आणि रेतीची वाढती मागणी पाहता रेती तस्करीला उत आल्याचे चित्र आहे.
तालुक्यात घरकुल योजनेची केंद्र सरकार पुरस्कृत प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत ३२२२,राज्य सरकार पुरस्कृत मोदी आवास योजनेंतर्गत १६९०,तर जनमन योजनेंतर्गत ८५० घरकुल बांधकामास मंजूरी मिळाली आहे. यातील आतापर्यंत १६५० वर घरकुल बांधकाम झाल्याची माहीती आहे. अजूनही मंजूर घरकुल पैकी ४००० घरकुल बांधकाम रेती अभावी ठप्प आहे.
तसेच घरकुल धारक रोज सेतुमध्ये विचारणा करत असतात मात्र लाभार्थ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने घरकुल लाभार्थी त्रस्त झाल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यामुळेच लिंकवर चढलेला माल कुठे जात आहे याची शहानिशा करावी व रोज लिंकवर किती माल चढत आहे याची माहीती देण्यात यावी असेही निवेदनात नमुद केले आहे.
गोरगरीब जनतेसाठी शासनाकडून अनेक योजनापैकी घरकुल योजना ही मुलभूत गरज आहे. घरकुल साठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव करतानाच त्रस्त झालेला लाभार्थी आता रेती मिळत नसल्याने व रेतीसाठी तालूकास्थळी होणाऱ्या हेलपाट्याने मेटाकुटीस आला. लाभार्थ्यांकडून गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर असलेल्या जनहित कल्याण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत रेती मिळत नसल्याचे अधोरेखित केल्याने जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी, घरकुल लाभार्थी, व कार्यकर्ते यानी तहसिलदारांना भेटून रेती उपलब्ध करुन देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
निवेदन देते वेळी गौरव आसेकर, अलताप कुरेशी, मोसीम कुरेशी, गोलू डंभारे, तुषार पवार, मोहित गेडाम, स्वप्नील तलांडे, पियुष डंभारे,कार्तिक पुनवटकर उपस्थित होते.