
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा भाग बनून जाते. शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करुन शिक्षण आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते.परिणामी राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता.१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी असे ४५ दिवस चाललेले हे अभियान स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व शाळांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते.
दरम्यान स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ‘ अभियान राबविण्यात आले.यात विविध उपक्रमांची सांगड घालून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली.सदर अभियानात विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. यात वृक्षारोपण, वर्ग सजावट सांस्कृतिक कार्यक्रम, परसबाग निर्मिती यासह सदर अभियानातील सर्व उपक्रम राबविण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत ताजणे यांच्या विशेष पुढाकाराने तसेच विद्यालयातील सहाय्यक शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या मदतीने ‘मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ अभियान पार पडले.