
♦बोरी (गदाजी) येथील यात्रेस आज पासून सुरुवात…
♦गोटमार पाहण्यास उसळला जनसमुदाय…
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
आज पासून बोरी (गदाजी) येथील “भव्य गोटामार यात्रा उत्सव” सुरू झाला असून “होलिका पर्वावर”आयोजित ही यात्रा तीन दिवस चालणार आहे.दैदिप्यमान असा गोटमार सोहळा बघण्याकरिता भक्तांची अफाट गर्दी बोरी (गदाची) येथे उसळली असून “महाराजांच्या बोरीला भक्तांची मांदियाळी” उसळल्याचे बोरी (गदाजी) येथे दिसून येत आहे.
तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील “गोटमार यात्रा” ही गेल्या अनेक वर्षापुर्वीपासुनची परंपरा असुन राज्यासह परराज्यात सुद्धा ही यात्रा प्रसिद्ध आहे.गावा शेजारून वाहणाऱ्या छोट्या नदीत गदाजी महाराज यांचे मंदिर असून दरवर्षी होलिका पर्वावर येथे तीन दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात येत असते.यावर्षी सुद्धा “होलिका पर्वावर”या गोटमार यात्रेस दिमाखात सुरुवात झाली आहे.


नियोजित वेळी सुरू झालेल्या गोटमार उत्सवात पहिला दगड सुरेश राजुरकर (५९) व दोन सख्ख्या बहिणी अंजली आणि तनुजा निमकर यांना लागला. दगड लागल्यानंतर वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार सुरेश राजूरकर यांना महाराजांच्या मंदिरात आणण्यात आले.असे केल्याने दगड लागलेला भक्त त्वरित बरा होतो अशी दृढ श्रद्धा असुन त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
भक्तांची घेतली जातेय विशेष काळजी…
बोरी गदाजी येथे आलेल्या भक्तांची विशेष काळजी घेतली जात आहे. पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था,महाप्रसादाची व्यवस्था,गाडी पार्किंग साठी वेगळी जागा तसेच यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ही लावण्यात आला आहे.

