
– सार्वजनिक गणेश मंडळांनी समाज प्रबोधन व प्रबोधनात्मक देखावे करावे.
– तालुक्यात १८ ठीकाणी सार्वजनिक गणेशोत्सव
– बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणेशभक्तांची आतुरता आज संपणार आहे.यावर्षी बाप्पा मंगळवार आज ता. १९ सप्टेंबरला विराजमान होणार असल्याने गणेश भक्तांच्या घरी तथा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातुन शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात जय्यत तयारी सुरु आहे. तालुक्यात एकुण १८ सार्वजनिक गणेश मंडळ असुन गणेश मंडळानी आजच्या परिस्थितीला अनुरुप समाज प्रबोधन व प्रबोधनात्मक देखावे करावे.
गणेशोत्सव हा सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केल्या जातो.सतत दहा दिवस चालणाऱ्या बाप्पाच्या मुर्तीची स्थापणा केल्यानंतर श्रध्देने व भक्ती भावाने पुजाअर्चा केली जाते. ग्रामिण भागातसुध्दा ठीकठीकाणी साजरा करण्यात येणाऱ्या या दहा दिवसात भजन, पुजन, किर्तन तर मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल असल्याने ग्रामिण भागात पारंपारीक नृत्य, दंडार, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारीक वाद्याचा गजर गणेश मंडपासमोर पहायला मिळत असुन समाजासाठी पोषक असलेले कार्यक्रम सुध्दा केल्या जाते.
मागील पाच वर्षापासुन तालुका अस्मानी संकटाचा सामना करत आहे. सततची नापिकी, कर्जबाजारी होत आलेल्या नैराश्यातून तालुक्यात आत्महत्या होत असल्याने संपुर्ण तालुका हादरला असुन ऐन उमेदीतील नवयुवक आत्महत्या करत असल्याने समाज मन सुन्न झाले आहे. घरचा कर्ता अथवा तरुण वयात आत्महत्या केल्याने आई वडीलांचा तथा कुटुंबाचा आधार हरवत आहे. यासाठी सुध्दा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सामाजिक बांधिलकी जपत दहा दिवसाच्या उत्सवादरम्यान समाज प्रबोधन व जन जागृती करावी.
देवाधिदेव गणराय ही आद्य पुज्यदेवता व विघ्नहर्ता आहे. शुभ कार्य करण्याच्या अगोदर गणपतीची पुजा केली जाते. मनुष्यावर कोणत्याही प्रकारचे विघ्न आल्यास मनुष्य भयभित होतो, परंतु असे म्हणतात की विघ्नहर्त्या बाप्पाची पुजा केल्याने विघ्न दुर जावुन मनुष्याला समाधान लाभते. त्यासाठी श्रध्देने बाप्पाची पुजाअर्चा केली जात असुन गणपती बाप्पा आज विराजमान होणार असल्याने शहरासह गावकुसातील गणेशभक्त जय्यत तयारीत आहेत.
तसेच गणेश मंडळांनी समाजात एकोपा वाढण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धेसह समाजोपयोगी कार्यक्रम राबवावे. त्याच सोबत देशा प्रती नवयुवकांच्या मनात देशप्रेम व स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची आठवण राहावी यासाठी देशभक्ती पर देखावे व कार्यक्रमाचे आयोजन करावे.