
– तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल ११ शाळा शिक्षकाविना
– शिक्षकांची १०८ पदे रिक्त
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त असतानाच, तालुक्यातील चक्क ११ शाळा शिक्षकाविना असुन तालुक्यात तब्बल १०८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनास आड येत असून शिक्षणाचे बाळकडु कसे घ्यावे…? असा प्रश्न चिमूकल्यांसह पालकांना पडला आहे.
आदीवासी बहुल तालुका असल्याने निसर्गाच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने सर्वसाधारण जिवन जगणाऱ्या पालकांची संख्या मोठी आहे.
परिणामी आर्थिक विवंचना मागावर असतांना गलेलठ्ठ शाळेतील प्रवेशासाठी सर्वसाधारण नागरीक इंग्लीश मिडीयम सारख्या शाळेला बगल देवुन आपल्या चिमुकल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत करुन शिक्षणाचे बाळकडु पाजण्याचा इवलासा प्रयत्न करत असतांना येथे मात्र शिक्षकांची पदे रिक्त असल्याने याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होत आहे.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेत आठ वर्ग आणि दोन किंवा तीन शिक्षक असे चित्र आहे.कोरोना मूळे दोन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांची वाया गेली.आता शिक्षकांच्या कमतरतेमूळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होण्याची वेळ तालुक्यातील विद्यार्थ्यावर आली आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १०४ शाळा असून यात ३७ उच्च प्राथमिक तर ६७ प्राथमिक शाळा आहेत. जवळपास अडीच हजार विद्यार्थी शिक्षणाचे बाळकडु घेण्याकरीता या शाळांमधून श्रीगणेशा करतात. विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर तालुक्यात ३२९ शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु सध्या तालुक्यात २२१ शिक्षक कार्यरत असून तब्बल १०८ शिक्षकांची पदे रिक्त आहे. त्यातही १४ आंतर जिल्हा बदली झाल्याने हा आकडा फुगुन तब्बल १२२ शिक्षकांची पदे आजतरी रिक्त आहेत.
तर शिक्षणाचा गाडा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सुध्दा पदे रिक्त असल्याने हा गाडा हाकलने आता अवघड होत चालला आहे. तालुक्यात १० केंद्र शाळा आहेत. या दहा केंद्रात दहा केंद्र प्रमुखाची आवश्यकता असताना सध्या एकमात्र केंद्र प्रमुख कार्यरत आहे.
एकुणच शिक्षण विभागातील रिक्त पदे तथा रिक्त असलेली शिक्षकांची पदे यामुळे थेट चिमुकल्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम करणारी ठरत असल्याने तालुक्यातील शिक्षण विभागाची रिक्त पदामुळे विस्कळीत झालेली घडी व्यवस्थित केव्हा होणार हे अधांतरीच आहे.
या शाळांना शिक्षकच नाही…
तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या हीवरी, मेंडणी, कानडा, मुक्टा वेगांव, केगाव, महागांव, टाकळी, रामेश्वर, बामर्डा, मांगली या ११ गावातील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकच नाही.त्यामुळे या विद्यार्थ्याचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासकीय नियमा प्रमाणे शाळा बंद ठेवता येत नसल्याने शाळा उघडायला उसनवारीवर आजूबाजूच्या शाळेतून एक शिक्षक या शाळेत पाठविला जात असल्याची माहीती आहे.