
– तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील कुंभा येथील शेतकरी पुत्र वृषभ विनोद ढाकणे याची नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिप चेन्नई करीता निवड करण्यात आली आहे.क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया विदर्भ द्वारा ही निवड करण्यात आली.तालुक्यातील शेतकरी पुत्राच्या ‘कुंभा टू चेन्नई’ अशा फिनिक्स भरारीने मारेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.परिणामी वृषभ कौतुकास पात्र आहे.
मारेगाव तालुक्यातील कुंभा आहे वृषभचे मूळ गाव.येथील ‘भारत विद्या मंदिरात’ वृषभने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.मारेगाव येथील ‘संकेत महाविद्यालयात’ बारावी पूर्ण केलेला ऋषभ सद्यस्थितीत मारेगाव आयटीआयचा विद्यार्थी आहे.
घरची परिस्थिती बेताचीच असताना वृषभचे वडील ६ एकर शेतीसह ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.वृषभ सह एक लहान भाऊ,आई-वडील ,आजी असा वृषभचा परिवार.
घरी कुणीही उच्चशिक्षित नसताना व घरची परिस्थिती नेटाची असताना वृषभची चक्क ‘चेन्नई इंटरनॅशनल क्रिकेट अकॅडमीत’ निवड झाली ती केवळ जिद्दीच्या बळावर.अभ्यासासह क्रिकेटच्या सरावात योग्य ताळमेळ राखत वृषभने ही फिनिक्स भरारी घेतली.
तुर्तास ‘कुंभा एक्सप्रेस चेन्नई दाखल’ झाली असुन या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या मलेशिया,युएई यांचेसह भारतातील कर्नाटक, हैदराबाद, पुणे, चेन्नई, महाराष्ट्र, तेलंगणा,विदर्भ, तामिळनाडू तसेच बेंगलोर यासारख्या राष्ट्रीय टीम भाग घेणार असून चेन्नई टीमचे प्रतिनिधित्व मारेगाव तालुक्याचा शेतकरी पुत्र वृषभ ढाकणे करणार ही अभिमानाची गोष्ट आहे.परिणामी वृषभचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.