
♦तालुक्यात रेती तस्कर पुनश्च ‘ऍक्टिव्ह’
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
शहरासह तालुक्यात सर्वत्र घर बांधणीची कामे सुरू असल्याने रेतीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील वर्धा नदीवरील व इतर रेती घाटांचे संरक्षण करण्याचे आव्हान आता तालुका प्रशासना समोर उभे ठाकले आहे.
रेतीला मिळणारे दर पाहता रेती तस्करांची संख्या वाढली आहे.मारेगाव शहरासह तालुक्यात ‘अव्वाच्या सव्वा’ भावाने रेती विकली जात असून “जनसामान्यांचा शिमगा रेती तस्करांची दीवाळी” असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.स्थानिक प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्करी दिवस-रात्र जोमात सुरू असल्याचा सुर जनसामान्यांत उमटत असुन शासनाच्या लाखो रुपयांच्या रायल्टीचे नुकसान होत आहे.तालुक्यात रेती तस्करीला चांगलाच जोम आला असून रेतिला मिळणारे ‘अमाप दर’ पाहता ‘नवनवीन रेती तस्करांनी डोके वर’ काढले आहे.
‘रेती तस्करीला लगाम’ लागला असल्याचे तालुका प्रशासनाकडून ‘दावे’ केले जात असले तरी तालुक्यातील रेती घाट बंद असताना घर बांधणीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात रेतीचा पुरवठा होतो कुठन…? हे न उलगडणारे कोडेच आहे.
या बेलगाम रेती तस्करां द्वारा दररोज हजारो ब्रास रेतिचा उपसा करून दिवसा ढवळ्या गरजुंना रेतीचा पुरवठा करुन जनसामान्यांच्या घशाला कोरड पाडण्याचे काम नॉन स्टॉप सुरू असून तालुका प्रशासनाने पुनश्च एकदा ‘रिस्टार्ट’ होऊन अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळन्याची नितांत गरज आता निर्माण झाली आहे.