
– सुगंधित तंबाखूचे भयान वास्तव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र शासनाच्या तंबाखू गुटखा बंदी कायद्यानुसार गुरुवारी शहरातील पाणटपऱ्यांवर मारेगाव पोलीस पथकाने कारवाई करुन पाच पानटपरी चालकांवर ‘हायस्पीड कारवाई’ करुण २०००/-₹ च्या वरती किंमत असलेले सुगंधीत तंबाखूचे (मजा) काही डब्बे जप्त करण्यात आले.परंतु ‘कुबेराचा खजाना’ असलेल्या तंबाखू व्यवसायाचा व्याप ‘सर्वव्यापी’ असून असल्या क्षुल्लक कारवाईने काहीही निष्पन्न होणार नाही.गरज आहे ती या व्यवसायाचे ‘बुड’ शोधून मुळासकट उपडून फेकण्याची.
सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीस शासन स्तरावरून बंदी आहे.मग बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा पुरवठा कुठून आणि कसा होतो…? हा गहन संशोधनाचा विषय आहे.मागील काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यात सुगंधी तंबाखू विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे धाड सत्र सुरू होते.लाखो करोडोंची उलाढाल असलेल्या या व्यवसायात अनेक लहान मोठे व्यापारी हाती लागले होते.यात मारेगाव व वणी येथील कारवाई बहुचर्चित होती.
बेरोजगारीचे लेबल लागलेल्या काही युवकांनी कुटुंब उदरनिर्वाहा करीता व्यवसाय म्हणून पानटपरी थाटली खरी….पण त्यांना या सागराच्या खोलीची पुसटशीही कल्पना नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी राबणे हाच त्यांचा हेतु.त्यांचेवर कारवाई करणे म्हणजेच हत्ती सोडून पालीचे शेपूट पकडण्याचाच प्रकार.
आज नितांत गरज आहे ती गुटखा व सुगंधीत तंबाखू व्यवसायाच्या तळाशी लपून बसलेल्या,भावी पिढीचे भविष्य गिळंकृत करु पाहणाऱ्या ‘मोठ्या माशांना’ शोधुन वर त्यांना गळात अडकवून वर खेचून त्यांचेवर कडक कारवाई करण्याची….!
ईवलीशी माफक अपेक्षा या ‘हायस्पीड’ कारवाई नंतर जनसामान्यातून व्यक्त होत आहे.