
– माधव नगरी वासियांची पोस्ट वर धडक
– आरोपींवर तात्काळ कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगावात बैलपोळ्याच्या मध्यरात्री तब्बल सतरा घरफोड्या झाल्या होत्या.यातील १० घरफोड्या एकट्या माधव नगरीत झाल्या होत्या.१५ सप्टेंबर रोजी घटनेची तक्रार माधव नगरी वासियांनी पोलीस स्टेशनला दाखल केली होती.परंतु या धक्कादायक घटनेच्या तपासावर येथील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.तपासाची दिशा जाणुन घेण्यासाठी माधव नगरी वासियांनी ३० सप्टेंबर रोजी मारेगाव पोलीस स्टेशन वर धडक दिली.यावेळी आरोपींवर तात्काळ कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करू असा इशाराही नागरिकांनी पोलीसांना दिला.
१४ सप्टेंबर रोजी मारेगाव शहरात एकाच रात्री तब्बल १७ घरफोड्या झाल्या होत्या. या सर्व घरफोड्या शहरातील वेगवेगळ्या भागात झाल्या असल्या तरी यातील एकट्या १० घरफोड्या माधव नगरीत झाल्या होत्या.येथील नागरिकांनी या घटनेची तक्रार १५ सप्टेंबर रोजी मारेगाव पोलिसात दाखल केली होती.
शहरात प्रचंड खळबळ माजलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनही कामाला लागले होते.फॉरेन्सिक टीम, श्वानपथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना यवतमाळातून मारेगावात पाचारण करण्यात आले होते.मारेगाव पोलिसांनीही काही धागा हाती लागतो का….? या अपेक्षेने यावेळी अवघे शहर पालथे घातले होते.अजुनपावेतो ही जंबो घरफोडी तपासात आहे.
दरम्यान ३० सप्टेंबर रोजी शहरातील माधव नगरी वासियांनी मारेगाव पोलीस स्टेशनवर धडक दिली.यावेळी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात मारेगाव घरफोडी घटनेतील चोरटयांना तात्काळ जेरबंद करा या प्रमुख मागणीसह सदर घटनेची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली आहे….? हे आम्हाला कळवावे ही बाब नमूद करण्यात आली आहे. सोबतच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी हेमराज कळंबे,अनिता कळंबे,सुरेश आत्राम,मंगेश गवळी,सुंदरलाल आत्राम,संतोष ठाकरे,सुनंदा कोळेकर,प्रांजली काकडे,राजू डवरे,संगिता डवरे,उज्वला बोकडे,दिपक उरकुडे,गणेश कनाके,रेखा कनाके,रमेश बोंडे,अरुणा ठाकरे,प्रविण लोंढे,ज्ञानेश्वर ढुमणे,विजय घोडमारे,वसंतराव कोल्हे,रविंद्र मिलमिले,राजेंद्र पोटदुखे,लिलाधर चौधरी,संजय खडसे,प्रेमा जुमडे,सिंधू बेसकर,सुनिता कोवळे,अर्चना कोवे,लिना पोटे,बाबाराव ढवस,संदिप अस्वले,प्रकाश भोंडेकर,संतोष आत्राम,सुनिल आसेकर,मंगला आसेकर आदी उपस्थित होते.