
– वास्तव…
मारेगाव तालुक्यातील मतदारांना पुढाऱ्यांकडुन अनेक पोकळ आश्वासने देवुन तालुक्यातील जनतेच्या मतदानरुपी आशिर्वादाने,ज्या लोकप्रतिनिधींना राजयोग लाभला,मात्र त्यांच्याकडुन दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने तालुक्यात समस्यांचा डोंगर उभा असुन सुध्दा आतापर्यंत लोक प्रतिनिधीकडुन जोरकस प्रयत्न होताना दिसत नसल्याचे वास्तव असल्याने हा लोक प्रतिनिधीच्या उदासीन धोरणाचा परिपाक म्हणने वावगे नसावे.
कायमच मारेगाव तालुका हा आतापर्यंत निवडुण आलेल्या लोक प्रतिनिधीकडुन उपेक्षित असला तरी मात्र निवडणुक काळात “डोअर टु डोअर ” भेटी देऊन तसेच “साम-दाम-दंड-भेद”विसरून
मतदानरुपी आशिर्वाद घेवुन निवडुण येण्याची चुरस निवडणुकांच्या अनुषंगाने यापुर्वी तालुक्यांतील नागरिकांना पहावयास मिळाली व मिळत आहे.
मागील दोन दोन दशकात कॉंग्रेस,शिवसेना,व बि.जे.पी.च्या कार्याचा आलेख पाहता कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधी कडुन मारेगाव सारख्या आदीवासी बहुल तालुक्यात विकासाभिमुख काम केल्याचे दिसत नसल्याचे चित्र आहे.शेतकरी शेतमजुर,बेरोजगार कायम दुर्लक्षित असुन कुठलीही ठोस उपाययोजना नाही. तालुक्यात उद्योग, लघुउद्योग किंवा तत्सम पर्यायी कोणतीही बेरोजगारी संदर्भात उपाययोजना नसल्याने मारेगावसह ग्रामिण ग्रामिण भागातील बेरोजगार युवक रोजगारासाठी मोठ्या शहराकडे धाव घेत असल्याचे वास्तव आहे.
तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.शेतकरी, शेतमजूर,बेरोजगार,व इतरही वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन जीवन यात्रा संपवित आहे.या आत्महत्या का होत आहेत…?यासाठी शासन-प्रशासन स्तरांवर चिंतन होणे अपेक्षित व गरजेचे असताना फक्त अशा कुटुंबाची सांत्वना भेट घेऊन त्यांना धिर दिल्या जात असला तरी यावर शासन स्तरावरुन ठोस उपाय योजना होणे गरजेचे असतांना तसे काही घडताना दिसुन येत नाही.
अनेक वर्षापासुन बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित असुन मोठा गाजावाजा करून उभारलेला प्रवासी निवारा सुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात येऊन अखेरची घटका मोजत आहे.यापेक्षा मारेगाव तथा तालुक्यातील जनतेचे कोणते दुर्दैव असु शकेल.? शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी तथा प्रवाशांना साधे उभे राहण्यासाठी जागा नाही.
बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागल्याचे फक्त बोलले जात असुन बस स्थानकाचे काम सुरू होण्यापूर्वीच प्रत्यक्षात मात्र सध्या श्रेय लाटण्यासाठी कांगावा पहावयास मिळत असुन लोक प्रतिनिधीकडुन आश्वासनाखेरीज काही मिळत नाही. तालुक्यात अशा अनेक समस्या असतांना याकडे सुध्दा लोक प्रतिनिधींकडुन सतत दुर्लक्ष होत असल्याचे आता तालुक्यातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
दरम्यान निवडणुक काळात मात्र प्रत्येक गावखेड्यात स्थानिक पुढारी तथा नेतेमंडळी,आजी माजी आमदार, खासदार, जि.प सदस्य, पंचायत समिती सदस्य तथा पक्षीय पदाधिकाऱ्यांची वर्दळ सुरु होत असल्याचेही नागरिकांनी पाहीले असुन एरवी कुणीही फीरकत नाही.
मागील पंचविस वर्षाचा सर्वच पक्षाच्या विकासाभिमुख कार्याचा आलेख पाहता मारेगाव शहरासह तालुक्यात खरच विकास होणार काय…?व लागलेले विकासाचे ग्रहण सुटेल काय? असे म्हणायची वेळ जनतेवर आली असुन लोकप्रतिनिधी वर जनतेचा रोष असल्याचे तालुक्यात पहावयास मिळत आहे.