
– तालुका काँग्रेस कमिटीचे विज वितरण अभियंत्यांना निवेदन
– तीन दिवसाचा अल्टीमेटम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शेती पिकांना पाण्याची नितांत गरज असताना गत काही दिवसापासून शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे.यात शेतकऱ्यांची प्रचंड हानी होत असून शेती पिकांना पाणीपुरवठा करण्यास अडचण येत आहे.परिणामी विजेचा सुरू असलेला लपंडाव तात्काळ थांबवा अशा आशयाचे निवेदन १९ ऑक्टोबर रोजी तालुका काँग्रेस कमिटीने एमएसईबी कार्यकारी अभियंत्यांना ३ दिवसांच्या अल्टिमेटमसह सादर केले.
मारेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका असून येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.या वर्षीचा हंगाम निसर्गाची अवकृपा होऊन थोडा अधिक पाऊस बरसुन कोरडा गेला.अशातच आता दर ५-५ मिनिटांनी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने महावितरण कडूनही शेतकऱ्यांची प्रचंड थट्टा उडवल्यागत भास होतो आहे.
दरम्यान मार्डी सह बोटोनी परिसरातील काही गावात दिवसात फक्त आठ तास वीज उपलब्ध असते.शेती पिकांना पाण्याची गरज असताना तुटपुंज्या आठ तासात शेतकऱ्यांनी नेमके करायचे काय…? हा यक्षप्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.
परिणामी शहरासह तालुक्यात सुरू असलेला विजेचा लपंडाव तात्काळ थांबवावुन लोड शेडिंग बंद करावे व शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी अशा आशयाचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीने महावितरण अभियंत्यांना देत ३ दिवसाचे आत सदर प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली.
यावेळी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बदकी, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शाहरुख शेख, अंकुश माफुर,आकाश भेले,समीर कुडमेथे, रॉयल सय्यद, प्रफुल उरकुडे,अनिल गेडाम यांचे सह शेकडो काँग्रेस समर्थक उपस्थित होते.