
♦शासकीय कर्मचारी रस्त्यावर…
♦कार्यालयीन कामकाज ठप्प
♦मारेगाव येथे बेमुदत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद
∗लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
“जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी”या प्रमुख मागणी सह अन्य मागण्या घेऊन आज पासून राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असुन मारेगाव तालुक्यात सदर संपास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शेकडो कर्मचारी यात सहभागी झाले.शहरातील आंबेडकर चौकातुन निघालेल्या रॅलीचे रूपांतर तहसील कार्यालय येथे सभेत झाले.मारेगाव उपविभागीय अधिकारी यांना “न्याय्य” मागण्याचे निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारी,निमसरकारी कर्मचारी, शिक्षक,शिक्षकेत्तर संघटना,समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या हाकेला प्रतिसाद देत महसूल,शिक्षण,आरोग्य, पंचायत,भूमी अभिलेख या सह इतरही सर्व संघटना संपात एकत्र आल्या.NPS रद्द करा-जुनी पेन्शन लागू करा ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.विशेष म्हणजे स्त्री कर्मचारी यांनी देखील या संपात हिरीरीने भाग घेतला.हा संप बेमुदत असल्याने मारेगाव तालुक्यातील सर्व शाळा बंद झाल्या.सर्व विभागातील कर्मचारी सहभागी असल्याने प्रशासन प्रभावीत झाले.”एकच मिशन जुनी पेंशन” या मागणीने परिसर दणाणून गेला.
सभेमध्ये विविध कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधीनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करून शासनाने राज्य दिवाळखोरीत जाण्याची चुकीची आकडेवारी दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची बाब अनेकांनी माडली.जो पर्यंत जुनी पेन्शन लागू केल्याची घोषणा करण्यात येत नाही तो पर्यंत हा संप मागे घेण्यात येणार नाही असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
या राज्यव्यापी संपामुळे मात्र तालुक्यातील “शासकीय कामकाज” प्रभावीत झाले.जुन्या पेन्शन च्या या आंदोलनाने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली असली तरी कर्मचारी मागण्यावर ठाम असतील असा निर्धार कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.